नागपूर विद्यापीठ : पाच वर्षात ९५ कोटींची बचतदिगांबर जवादे - गडचिरोलीपरीक्षा शुल्कापोटी विद्यार्थ्यांकडून जमा होणारी रक्कम दरवर्षीच शिल्लक राहत असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रशासन मात्र दरवर्षी परीक्षा शुल्कात वाढ करीत होते. याला अंदाजपत्रकीय सभेत सिनेट सदस्यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात शुल्क वाढ केली जाणार नाही, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठांतर्गत व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात २० टक्के व साधारण अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात १० टक्के दरवर्षी वाढ करण्यात येत होती. परीक्षा शुल्कापोटी प्राप्त झालेल्या रक्कमेपैकी सुमारे २५ टक्के रक्कम बचत होत होती. २००९ ते २०१४ या कालावधीत परीक्षा शुल्कापोटी २७३ कोटी ७२ लाख ४० हजार रूपयाचा निधी प्राप्त झाला. यातून परीक्षेचा खर्च भागून सुमारे ९४ कोटी ५४ लाख ९२ हजार रूपयाचा निधी शिल्लक राहिला आहे. यापूर्वीच्या २० वर्षापासूनचा शेकडो कोटीचा निधी शिल्लक असून सदर निधी फिक्स डिपॉझीटमध्ये टाकण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासन व बँका गब्बर झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या खिशाला मात्र चोट सहन करावी लागत होती. विद्यापीठाच्या या अन्यायकारक धोरणाबद्दल विद्यार्थी, विद्यार्थी संघटना व शिक्षकांनी तीव्र विरोध केला होता. मात्र विद्यापीठ प्रशासन महागाईचे कारण देत मानण्यास तयार नसल्याने दरवर्षी परीक्षा शुल्कात वाढ केली जात होती. विद्यापीठाची अंदाजपत्रकीय सभा नुकतीच पार पडली. या सभेत सिनेट सदस्य प्रकाश गेडाम यांनी मागील २० वर्षापासून परीक्षा शुल्कातून शिल्लक राहत असलेल्या निधीचा आकडा कुलगुरूंसमोर सादर केला. विद्यापीठाकडे शेकडो कोटीचा निधी शिल्लक असतानाही परीक्षा शुल्कात वाढ का करण्यात येत आहे. याबद्दल कुलगुरूंना धारेवर धरले. त्यांला इतर सिनेट सदस्यांनीही साथ दिली. सिनेट सदस्यांचे आक्रमक रूप बघून कुलगुरूंनी यावर्षी परीक्षा शुल्कात वाढ न करण्याचा निर्णय घेतला.
परीक्षा शुल्क वाढीला ब्रेक
By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST