पोलीस ठाण्यात फ्री स्टाईल : बिल्डर कटरेलाही अटक
नागपूर : दोन लाखाच्या हिस्सेवाटणीमुळे मतभेद झाल्याने पोलीस ठाण्यातच एकमेकांना बदडून काढणार्या दोन्ही पोलीस कर्मचार्यांना आज पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. दरम्यान, ज्याच्यापासून हे प्रकरण सुरू झाले, त्या रामलाल कटरे नामक बिल्डरलाही पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. शहर पोलीस दलाच्या तोंडाला काळे फासणारी ही घटना रविवारी सायंकाळी कळमना पोलीस ठाण्याच्या आवारात घडली होती. बहुचर्चित अनंता सोनी हत्याकांडातील आरोपी बिल्डर रामलाल कटरेने मृत सोनीच्या पत्नीचा भूखंड हडपण्याचे प्रयत्न केले होते. त्याची तक्रार करणार्या सोनीच्या पत्नीला कळमना पोलीस ठाण्यातील नागोराव तुळशीराम इंगळे (वय ५१) आणि मेघनाथ विश्वनाथ तरडे (वय ३७) या दोन पोलिसांनी टरकावून लावले. त्यांनी आरोपी कटरेला मदत करून त्याबदल्यात इंगळेने ५० हजार आणि तरडेने दीड लाख रुपये घेतल्याची चर्चा होती. ही माहिती मिळाल्याने इंगळेने तरडेला दीड लाखातील ५० हजार रुपये मागितले. तरडेने नकार दिल्यामुळे त्यांच्यात वाद पेटला. दरम्यान, रविवारी सायंकाळी इंगळे पत्नी आणि मुलांसह कळमना ठाण्यात पोहोचल्यानंतर तरडेने त्याच्यावर हल्ला चढवला. प्रत्युत्तरात इंगळेच्या मुलांनी आणि पत्नीने तरडेला चपलेने झोडपून काढले. तब्बल १० मिनिटे पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू असलेली ही हाणामारी बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यानंतर या दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या. त्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल झाले. पोलिसांची प्रतिमा मलिन करणार्या प्रकरणाचे लोकमतने सोमवारी आणि मंगळवारी ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. पोलिसांमधील ही खुन्नस कशासाठी सुरू आहे, त्याचेही विश्लेषण केले. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी आज इंगळे आणि तरडेच्या निलंबनाचे आदेश काढले. (प्रतिनिधी) बिल्डर कटरेही अडकला या गंभीर प्रकरणाची वरिष्ठांनी तेवढीच गंभीर दखल घेत मुळापासून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, एसीपी कुमरे, ठाणेदार सत्यजित बंडीवार यांनी चौकशी केली असता हक्क नसलेल्या भूखंडाची कटरेने विक्री करून सोनी परिवाराची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यामुळे आज बिल्डर कटरेविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली.