नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे २००० डोस मिळाले. आता आरोग्य विभागाने ‘बुस्टर’ डोससाठी ३२०० डोस दिले आहेत. विशेष म्हणजे, कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
राज्यात नुकतेच सिरम इन्स्टिट्यूटचे कोविशिल्डचे ८ लाख ३९ हजार डोस उपलब्ध झाले. यात नागपूरच्या वाट्याला ३८ हजार ५०० डोस आले. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा डोस राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये दिला जात आहे. यात मुंबई येथील जे. जे. रुग्णालय, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तर पुणे व अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयांमधील केंद्रांचा समावेश आहे. परंतु सर्वच ठिकाणी कोव्हॅक्सिनला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे.
-१४००मधून ४४० लाभार्थ्यांनाच लस
मेडिकलमध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरणाचे दोन केंद्र आहेत. दोन्ही केंद्रांना २९ जानेवारीपर्यंत १४०० लसीकरणाचे लक्ष्य होते. परंतु त्यापैकी ४४० लाभार्थ्यांनीच लस घेतली. याचे प्रमाण ३१.४२ टक्के आहे. विशेष म्हणजे, ‘अ’ केंद्रावर १००० पैकी ३४८ तर, नुकतेच सुरू झालेल्या ‘ब’ केंद्रावर ४०० पैकी ९२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. डॉक्टरांच्या तुलनेत लिपीक व कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे.
-२००० लाभार्थ्यांचे लसीकरण होणार का?
मेडिकलला लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २००० डोस देण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत ४४० लाभार्थ्यांना डोस देण्यात आले. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला त्यांना लस टोचल्याच्या २८ दिवसांनंतर दुसरा बुस्टर डोस दिला जाणार आहे. यासाठी ३२०० डोसही उपलब्ध झाले आहेत. परंतु कोव्हॅक्सिनला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे पहिल्या टप्प्यात ५० टक्के तरी लसीकरण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.