नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ज्या प्रतिबंधक लसीकरणाचे संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता त्याची सुरुवात १६ जानेवारीपासून झाली. पहिल्याच दिवशी ७७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. पहिल्या डोजनंतर २८ दिवसांनी ‘बूस्टर’ डोज देण्याचा नियम आहे. त्यानुसार शनिवारी हा डोज देणे अपेक्षित होते. परंतु १५ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे .
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ११८५ पैकी ७७६ लाभार्थ्यांनी लस घेतली होती. परंतु दरम्यानच्या काळात लसीकरणाच्या टक्केवारीत घट आल्याने सोमवारी यातील किती लाभार्थी लस घेण्यासाठी पुढे येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. साथरोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांच्यानुसार, पहिला डोज घेतल्यानंतर साधारण ५० टक्के लोकांमध्ये थोड्या प्रमाणात अँटिबॉडी वाढतात. अँटिबॉडी वाढायला साधारण दोन आठवड्याचा कालावधी लागतो. परंतु दुसऱ्या डोजनंतर अँटिबॉडी गतीने वाढतात. यामुळे दुसरा डोज महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
-शहरात १४२० लाभार्थ्यांचे लसीकरण
शनिवारी शहरातील १९ केंद्रांना प्रत्येकी १०० प्रमाणे १९०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १४२० लाभार्थ्यांनी लस घेतली. सर्वाधिक लसीकरण किंग्जवे हॉस्पिटलच्या केंद्रावर झाले. १६० लाभार्थ्यांनी लस घेतली. सर्वात कमी लसीकरण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) केंद्रावर झाले. केवळ ३ लाभार्थ्यांनी लस घेतली. ५० च्या आत लसीकरण झालेली ७ केंद्र आहेत.