नागपूर : सीताबर्डी टेकडी मार्गावर आज दुपारी बॉम्बची अफवा पसरल्याने खळबळ निर्माण झाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने श्वानाच्या मदतीने कसून तपासणी केल्यानंतर तेथे खेळणीवजा घड्याळ मिळाले. टेकडी मार्गावरील सुरक्षा विभागाच्या भिंतीलगत एक खरड्याचा बॉक्स बेवारस अवस्थेत पडून दिसला. त्यातून टिक टिक आवाज येत असल्यामुळे बॉम्बची अफवा कुणीतरी पसरविली. त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. मोठा पोलीस ताफा, बीडीडीएसचे पथक घटनास्थळी पोहोचले. अधिवेशनामुळे परिसरात आंदोलकही मोठ्या संख्येत होते. पोलिसांनी गर्दी बाजूला सारून ‘त्या’ बॉक्सची श्वानाच्या मदतीने तपासणी केली. चौकशीत या बॉक्समध्ये एक घड्याळ आढळले. टिक टिक वाजत असल्यामुळे त्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. खेळणीसारखे दिसणारे हे घड्याळ कुणी तेथे सोडले असा प्रश्न आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठी हे घड्याळ येथे टाकण्यात आले असावे, असाही तर्क व्यक्त करण्यात येत होता.(प्रतिनिधी)
बॉम्बच्या अफवेने खळबळ
By admin | Updated: December 11, 2014 00:48 IST