नागपूर : कळमना हद्दीतील ओमसाईनगर येथे राहणार्या ७३ वर्षीय वृद्धाचा अज्ञात मारेकर्यांनी गळा दाबून खून केला. नरसिंगदास मोतीलाल प्रजापती, असे मृताचे नाव असून ते सेवानिवृत्त शिक्षक होते. नरसिंगदास हे मूळचे गोवर्धननगर तुमसर येथे राहणारे होते. तुमसर येथे त्यांचे घर असून त्यांची पत्नी आणि मुले तुमसरला राहतात. निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी ते नागपूरला राहायला आले होते. ओमसाईनगर येथे त्यांनी दुकानासाठी एक ब्लॉक खरेदी केला होता. त्याच खोलीत ते राहत होते. आपल्याच हाताने ते स्वयंपाक करायचे. नरसिंगदास यांच्याच गावी राहणारा रामप्रसाद शिंदपुरे हा दररोज त्यांना भेटायला येत असे. शनिवारी सकाळी रामप्रसाद नरसिंगदास यांना भेटायला आला. त्याने आवाज दिला परंतु नरसिंगदास यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. नरसिंगदास झोपला असावा, असे समजून रामप्रसाद निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास रामप्रसाद पुन्हा आला. त्याने दाराला धक्का दिला असता दार उघडले. आत जाऊन पाहणी केली असता नरसिंगदास मृतावस्थेत पडून होते. मारेकर्यांनी त्यांचे हातपाय बांधले आणि वायरने गळा आवरून त्यांचा खून केला. रामप्रसादने कळमना पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
सेवानिवृत्त शिक्षकाचा गळा दाबून खून
By admin | Updated: May 26, 2014 00:58 IST