माध्यमांनाही मज्जाव : ५०० मीटरपर्यंत जमावबंदी, क्युआरटीसह तगडा पोलीस बंदोबस्तनागपूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला गुरुवारी फासावर लटकवण्यात येणार असल्याचे बुधवारी निश्चित होताच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तुरुंग परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याअंतर्र्गत बुधवारी सायंकाळपासून तुरुंग परिसरापासून ५०० मीटरपर्यंत जमाव बंदीची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकारही यातून सुटलेले नाहीत. हे आदेश ३१ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी दुपारनंतर याकूबच्या फाशीचा निर्णय स्पष्ट होताच पोलिसही सतर्क झाले आहेत. वर्धा रोडवर (दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या चौकाच्या पलीकडे) नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित वाहनांना डिटेन करण्यात येत आहे. यासोबत फाशीची अंमलबजावणी होत असताना समाजातील उपद्रवी घटकांकडून तुरुंग परिसरात शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता अजनी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बी.एस. बुधवंत यांनी तुरुंग परिसरात कलम १४४ लागू करण्याची घोषणा केली. याअंतर्गत मध्यवर्ती कारागृह बाहेरील भिंतीपासून ५०० मीटरपर्यंत आजूबाजूच्या परिसरामधून कुणी इसम, जमाव, पत्रकार, (शासकीय किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी असलेले लोक सोडून) प्रवेश करणार नाही किंवा आढळून येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच तुरुंगाच्या चारही बाजूने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मध्यवर्ती तुरुंगातील मुख्य गेट २४ तास बंद करण्यात आले आहे. क्यूआरटीसह बंदुकधारी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची जातीने विचारपूस केली जात आहे. (प्रतिनिधी)देशभरातील पत्रकार दाखल दरम्यान याकूब मेमनला होणाऱ्या फाशीचे वृत्त कव्हर करण्यासाठी देशभरातील मीडिया नागपुरात दाखल झाला आहे. तुरुंग प्रशासनातर्फे पत्रकारांसाठी तुरुंगाबाहेर एक जागा निश्चित करून दिली होती. तेथून देशभरातील टीव्ही चॅनल आणि वर्तमानपत्रातील प्रतिनिधी तुरुंग परिसरातील प्रत्येक घटनांवर नजर ठेवून होते. परंतु सायंकाळ होताच धंतोली पोलिसांतर्फे कलम १४४ ची घोषणा करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. हे आदेश ३१ तारखेपर्यंत राहणार असल्याने गुरुवारी होणाऱ्या फाशीचे वृत्त कव्हर कसे करणार, असा प्रश्न प्रसिद्धी माध्यमांनी उपस्थित केला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यासंबंधात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलिसांतर्फे देण्यात आले. सर्वांच्या नजरा तुरुंगाकडे याकूबच्या फाशीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी फाशीसंबंधी निर्णय होणार असल्याने सर्वांमध्ये कुतूहल होते. देशभरातील मीडिया नागपुरात दाखल झाला. इलेक्ट्रॉनिक्स चॅनल्सच्या ओबी व्हॅन वर्धा रोडवर रांगेने उभ्या असल्याने वर्धा रोडने ये-जा करणाऱ्या लोकांसह सर्वांच्याच नजरा तुरुंगाकडे होत्या. प्रत्येकजण आपली वाहने काही वेळ थांबून तुुरुंगाकडे कुतूहलाने पाहत होते. दिल्लीतील दोन तरुण ताब्यात ‘डेथ पेनाल्टी’ वर लघुपट तयार करण्यासाठी नागपुरात पोहोचलेल्या दिल्लीतील दोन तरुणांना बुधवारी धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसूनही ते छायाचित्रण करीत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.
तुरुंगाच्या चारही बाजूंची नाकाबंदी
By admin | Updated: July 30, 2015 02:53 IST