नागपूर : परपुरुषांना धमकावून त्यांच्यासोबत अश्लील छायाचित्र काढणाऱ्या व त्यानंतर पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या एका महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे.उषा उर्फ लिना अनिल सहारे (३५) असे आरोपीचे नाव असून ती अंगुलीमालनगर, नारी रोड येथील रहिवासी आहे. याप्रकरणात एकूण सहा आरोपी असून अन्य आरोपींमध्ये अभिजित सोळंकी, विक्रांत नायडू, अंकुश रामटेके, रंजिता वंजारी व पायल बागडे यांचा समावेश आहे. जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३८४, १०९, १७०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस तक्रारीनुसार, सुगतनगर येथील फिर्यादी रवींद्र मेश्राम हे ५ एप्रिल रोजी मोटरसायकलने कामावर जात असताना उषाने लिफ्ट मागितली होती. रस्त्यात उषाने ती महिला बचत गट चालवित असल्याचे व प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. प्लॉट खरेदी करायचा झाल्यास संपर्क साधण्यासाठी तिने मोबाईल क्रमांक दिला. यानंतर ६ एप्रिल रोजी मेश्रामने उषाला प्लॉटसंदर्भात विचारपूस केली. उषाने त्याला समतानगर येथील घरी बोलावले. मेश्राम व त्याचा मित्र हरेकृष्ण शाहू हे संबंधित घरी गेल्यानंतर आरोपींनी घराचे दार बंद करून त्यांना मारहाण केली. तसेच, कपडे काढायला लावून महिलेसोबत अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देऊन २५ हजार रुपये घेतले. आरोपींनी पीडितांना ब्लॅकमेल करून एकूण ६० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. मेश्रामने स्वत:च पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर ५ आरोपी गजाआड झाले. उषा सहारे अद्यापही फरार आहे. सत्र न्यायालयाने ६ मे रोजी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. यामुळे ती उच्च न्यायालयात आली होती. अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी विविध मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरोपीचा अर्ज फेटाळण्याची विनंती केली होती. अविनाश अक्केवार यांनी शासकीय कामकाजात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
ब्लॅकमेलर महिलेचा जामीन फेटाळला
By admin | Updated: June 28, 2014 02:40 IST