- मुलांच्या पुनर्वसनाची उचलली जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जैन संघटन (बीजेएस) कोरोनामुळे बेवारस झालेल्या ७०० मुलांचा आधार बनली आहे. त्यांचे शिक्षण आणि पुनर्वसन करण्याची जबाबदारी संघटनेने घेतली आहे. बीजेएस नागपूर सेंट्रल शाखेने या योजनेचे क्रियान्वय नागपूर जिल्ह्यात करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या बैठकीत या योजनेचे संचालक म्हणून अनिल जैन यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
बैठकीनंतर बीजेएस नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचीही भेट घेतली. चर्चेदरम्यान संघटनेने प्रशासनाच्या माध्यमातून ते अनाथ मुलांची यादी घेणार असल्याचे सांगितले. यात ज्या मुलांचे आई-वडील दगावले, त्यांचा समावेश केला जाईल. सोबतच पाचव्या व आठव्या वर्गात मराठी माध्यमात असलेल्या मुलांना पुणे येथे शिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली जाईल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बीजेएसच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्याचे आश्वासन दिले. पुणे येथील वाघोलीमध्ये बीजेएसच्या शैक्षणिक परिसरात मराठी माध्यमातील शाळेत या मुलांना प्रवेश दिला जाईल. त्याच परिसरात विद्यार्थी वसतिगृह, भोजन, अध्ययन, उपचार आदींची व्यवस्था केली जाईल. नागपूर सेंट्रल शाखेने या योजनेच्या संचालनासाठी १० पथके नेमली आहेत. पथक प्रमुखांत सोहन झामड, पवन खाबिया, अमित सुराणा, अकील दर्डा, नितीन गुंडेचा, पीयूष फतेपुरिया, अमित कोठारी, अमित पारख, पूजा तातेड, पूजा ओस्तवाल, दीपक शेंडेकर, दिनेश जोहरापूरकर, रवींद्र तुपकर, रमेश कोचर, प्रवीण कापसे व प्रीती रांका यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांचे मार्गदर्शन रजनीश जैन, निखिल कुसुमगर व सचिन कोठारी करतील. संस्थेने गेल्या ३० वर्षात तीन हजार विद्यार्थ्यांचे पुनर्वसन केल्याची माहिती नागपूर सेंट्रल शाखेचे अध्यक्ष आनंद ओस्तवाल व सचिव मोहित बोथरा यांनी दिली.
.................