लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावनेर येथील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. 'जो कुणी भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरेल, त्यांना घरात घुसून मारू' असे त्यांनी सांगितले आहे.सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटन कार्यक्रमात गुरुवारी केदार यांनी ही धमकी दिली. केदार यांच्या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी केदार यांच्या कृतीचा निषेध करीत यासंदर्भात दखल घेण्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली.सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथे गुरुवारी स्टार बसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वादाचे ब्रेक लागले. कार्यक्रमाच्या आयोजनावरुन काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमोरासमोर आले.सिल्लेवाडा ग्राम पंचायतीच्या वतीने सिल्लेवाडा-नागपूर स्टार बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता लालचौक, सिल्लेवाडा येथे ठेवण्यात आला होता. आ.केदार या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तर भाजपच्या वतीने ग्रा.पं.सदस्य अनिल तंबाखे यांच्या पुढाकाराने सकाळी १० वाजता बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार उद्घाटक होते. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाला डावलून भाजपने परस्पर बस सेवेचा उद्घाटन कार्यक्रम सुरु केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. तेवढ्यात केदार कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी कार्यक्रमाचे श्रेय लाटण्यावरुन कॉँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. पोतदार आणि केदार यांच्यातही कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाला. भाजपचा कार्यक्रम झाल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी केदार यांच्या हस्ते बस सेवेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात केदार यांनी उपरोक्त विधान केले. केदार यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून याचा निषेध करण्यात येत आहे.केदार यांची गुंडगिरी सहन करणार नाही -पोतदारसिल्लेवाडा येथील कार्यक्रमात आ.सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांनी दिलेली धमकी ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. केदार यांनी गुंडगिरी भाजप सहन करणार नाही असे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी शुक्रवारी नागपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.सिल्लेवाडा येथील घटनेबाबत नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी. यासंदर्भात भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. सावनेर तालुक्यात गुंडांचा हैदोस वाढला आहे. रेती माफियापासून तर अवैध धंदे करणाऱ्यांना केदार यांचा आश्रय असल्याचा आरोप पोतदार यांनी केला.भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता स्वाभिमानाने पक्षाचा झेंडा आपल्या घरावर लावेल, कुणी त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, असा इशार पोतदार यांनी दिला. या घटनेबद्दल आम्ही पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेत जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, सोनबा मुसळे, संजय टेकाडे, प्रकाश टेकाडे आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यात कॉँग्रेसच्या आमदाराची भाजप कार्यकर्त्यांना धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:31 IST
सावनेर येथील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. 'जो कुणी भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरेल, त्यांना घरात घुसून मारू' असे त्यांनी सांगितले आहे.
नागपूर जिल्ह्यात कॉँग्रेसच्या आमदाराची भाजप कार्यकर्त्यांना धमकी
ठळक मुद्देहातात भाजपचा झेंडा दिसल्यासघरात घुसून मारणार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल