नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री कार्यालयातून विमान प्रवासाची परवानगी न मिळाल्याने त्यांना विमानातून उतरावे लागल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप -प्रत्यारोप होत आहेत. यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील आपले मत व्यक्त केले आहे. राज्यमंत्री कडू गुरुवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना या वादावर छेडले असता त्यांनी राज्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या राजकारणाकडे बोट दाखविले. भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका ही राज्यपालांसारखी नाही. ते एका पक्षाची भूमिका घेत आहेत. ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरापासून त्यांची भूमिका पाहिली तर ते राज्यपाल आहेत की भाजपचे प्रवक्ते, हेच कळायला मार्ग नाही. राज्यपालपद अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी या पदाची गरिमा कायम राखावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत विमान मिळाले नाही, यामागे काही तांत्रिक कारण असावे, असे सांगितले.
राज्यपाल आहेत की भाजपचे प्रवक्ते : बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:08 IST