नागपूर : शहरात भाजपबद्दल, आमदारांबद्दल तशी नाराजी नाही. पण महापालिका व नगरसेवकांबद्दल मोठ्या प्रमाणात ‘ॲन्टी इनकम्बसी’ आहे. याचा विचार प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करायचा आहे, असे सूतोवाच खुद्द भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने निष्क्रिय भाजप नगरसेवकांची चिंता वाढली आहे.
भाजपतर्फे ९ व १० जानेवारी रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. बंदद्वार झालेल्या या वर्गात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी आ. प्रवीण दटके यांनी भाजप नगरसेवकांचे उघडपणे कान टोचले. त्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. वर्षभरानंतर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे भाजपने नगरसेवकांच्या एकूणच कामाचा आढावा घेणे सुरू केले आहे. दटके यांचे हे वक्तव्य निष्क्रिय व आडमुठी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांसाठी धोक्याची सूचना मानले जात आहे.
नगरसेवकांना एकमेकांचे
तोंड पहायची पण इच्छा नाही
- दटके यांनी नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंर्तगद वादालाच हात घातला. ते म्हणाले, दक्षिण-पश्चिम नागपुरात बहुतेक प्रभागात चार नगरसेवक आहेत. मात्र, असे दोन-तीन प्रभाग आहेत की जेथे नगरसेवकांना एकमेकांचे तोंड पहायची पण इच्छा नाही. आता पुढचे वर्षभर आपल्याला पोरीच्या बापाच्या भूमिकेत राहायचे आहे, असे सांगत एकमेकांशी समन्वयाने व नागरिकांशी संयमाने वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला.