दलित महिलेचे घर पाडले : नागार्जुन कॉलनी परिसरात संतापनागपूर : एका दलित महिलेचे घर बळजबरीने पाडून तिला रस्त्यावर आणण्यात आले. उत्तर नागपुरातील एका बड्या भाजप पदाधिकाऱ्याने हा सर्व खेळ केला. या घटनेला २३ दिवस लोटले आहे. एकीकडे पीडित महिला न्यायासाठी वणवण भटकत आहे, तर दुसरीकडे नासुप्र आणि जरीपटका पोलीस या पदाधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई न करता हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात आहे. एकूण ‘अॅडजेस्टमेंट’ पाहता या दलित महिलेला न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागार्जुन कॉलनी नारा रोड परिसरातील नागरिकांमध्ये रोष आहे. सुजाता नागदिवे असे या पीडित महिलेचे नाव आहे. त्या नागार्जुन कॉलनी नारा रोड येथे पती आणि मुलासोबत मागील १५ वर्षांपासून राहात होत्या. त्यांची मुलगी सुकेशनी करवाडे आणि तिचा मुलगासुद्धा त्यांच्यासोबतच राहात होते. परंतु एका बिल्डरची त्यांच्या झोपड्यावर नजर गेली आणि षड्यंत्र रचून त्याने त्यांचे घर पाडले. सध्या त्या श्रावस्तीनगर झोपडपट्टीतील आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आश्रयाला आहेत. नागदिवे यांची भेट घेतली असता पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी आपली व्यथा सांगितली. त्या म्हणाल्या, नागार्जुन कॉलनीमध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून राहात आहे. जवळपासही काही घरे होती. आमच्या घरामागच्या बाजूलाच बिल्डर आणि भाजपा युवा मोर्चा उत्तर नागपूरचे अध्यक्ष विक्की कुकरेजा यांची एक फ्लॅट स्कीम सुरू होती. जसजशी स्कीम पूर्ण होऊ लागली तशी कुकरेजा यांच्याकडून घर सोडून जाण्याबाबत धमकी मिळायला सुरुवात झाली. सुरुवातीला याकडे आम्ही दुर्लक्ष केले. परंतु जवळपासच्या काही लोकांनी घर सोडून पळ काढला तेव्हा भीती वाटायला लागली. जरीपटका पोलिसांकडे तक्रार केली. परंतु काहीही कारवाई झाली नाही. एक नव्हे तर चारवेळा तक्रारी केल्या, मात्र कुणीही ऐकले नाही. अखेर ८ जून रोजी कुकरेजा यांच्या निर्देशावरून काही असामाजिक तत्त्वांच्या मंडळींनी बुलडोझर आणून घर पाडले. आम्ही रस्त्यावर आलो. आमच्या हक्काचे घर होते, परंतु कुणीही आमचे ऐकले नाही. आमच्याच घरासाठी आज शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. एकेका कागदासाठी अधिकारी, कर्मचारी पिळवणूक करीत आहेत. आज २३ दिवसांपासून आम्ही घराबाहेर आहोत.सध्या जाऊकडे आश्रयाला आहोत. परंतु असे किती दिवस चालणार? भाजप नेते लोकांच्या मदतीसाठी धावून जातात, असे ऐकले होते. पण येथे तर ते लोकांचे घर बळकावत आहेत आणि अशा पदाधिकाऱ्यांना पक्ष संरक्षण देत आहे, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारला. (प्रतिनिधी)
भाजप पदाधिकाऱ्याला नासुप्र व पोलिसांचे अभय
By admin | Updated: July 1, 2014 01:01 IST