काटोलमध्ये तणाव : हेटी प्रभागात वाद काटोल : नगर परिषदेसाठी मतदान सुरू असतानाच दुपारच्या सुमारास किरकोळ वाद उद्भवला. त्यातून भाजपचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी ‘विदर्भ माझा’च्या चरणसिंग ठाकूर यांच्या गाडीवर दगड फेकला. त्यात गाडीची काच फुटल्याने वादावादी झाली. या प्रकरणी ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदाराविरुद्ध काटोल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काटोल नगर परिषद निवडणूक रिंगणात भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही उडी मारली आहे. त्यातच भाजपपासून दुरावलेला चरणसिंग ठाकूर गट हा विदर्भ माझा पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे काटोलमधील निवडणूक रंगतदार झाली आहे. अशात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्रभाग क्र. २ मधील हेटी परिसरात विदर्भ माझा पक्षाचे उमेदवार चरणसिंग ठाकूर हे आपल्या समर्थकांसह आपल्या एमएच-४०/एसी-७२२२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने गेले. त्यातच ते एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात काटोलचे भाजप आ. डॉ. आशिष देशमुख हे तेथे आले. चरणसिंग ठाकूर यांची गाडी रस्त्यावर उभी असल्याने त्यांनी गाडी कुणाची आहे, पैसे वाटत आहे का, असे म्हणत त्या गाडीच्या दिशेने दगड भिरकावला. त्यामुळे गाडीचा मागचा काच फुटला. परिणामी चरणसिंग ठाकूर आणि आ. देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हेटी प्रभागात वाद सुरू असल्याची बाब मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी भादंविच्या कलम ३३६, ५०४, ५०६, ४२७ अन्वये आ. देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर रात्री उशिरा आ. देशमुख यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (तालुका प्रतिनिधी) आमदार आणि ठाकूर यांच्यात दुरावा काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर गटाची पाच वर्षांआधीच्या १० वर्षे सत्ता होती. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत ठाकूर गटाला शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख यांनी धक्का देत सत्ता स्थापन केली. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी शेकापच्या १० नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आल्याने शेकापच्या हातातील सत्तेची चावी भाजप समर्थित ठाकूर गटाकडे आली. मात्र या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये जोरदार हालचाली होऊन चरणसिंग ठाकूर हे आपल्या गटासह विदर्भ माझा पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले. सध्यास्थितीत विदर्भ माझा पक्ष, भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, राष्ट्रीय समाज पक्ष, बसपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: January 9, 2017 02:36 IST