नागपूर : ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचारासाठी आलेले पक्षी बरे झाल्यानंतर त्यांना मूळ अधिवासात मुक्त करण्यापूर्वी विशिष्ट रिंग लावून मुक्त केले जाणार आहे. या रिंगवर ट्रान्झिटचा क्रमांक मुद्रित असेल. यामुळे संकटग्रस्त पक्ष्यांवर लक्ष ठेवणे शक्य हाेइल आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावा केला जात आहे.
ट्रान्झिट सेंटरमध्ये दरराेज अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी उपचारासाठी आणले जातात. यामध्ये पक्ष्यांचाही माेठ्या प्रमाणात समावेश असताे. आजतागायत शेकडाे पक्ष्यांवर यशस्वी उपचार करून त्यांच्या अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. यामध्ये दुर्मिळ व स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. मात्र यानंतर पक्ष्यांना मुक्त करताना टीटीईची मुद्रित रिंग लावूनच मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी दिली. आज भारतात स्थानिकसह इतरही स्थलांतरित पक्ष्यांवर संशोधन सुरू आहे. परंतु उपचारासाठी आलेले पक्षी रिंग लावून मुक्त करण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. त्या पक्ष्यांचे काय होते, ते कुठे जातात, त्यांच्या अधिवासात ते कसे जगतात हे जाणून घेणे हा यामागचा उद्देश असल्याचे हाते यांनी स्पष्ट केले.
उपचारानंतर बरे झालेले पक्षी सामान्य आयुष्य जगतात का? उपचारानंतर त्यांना परत इजा झाली आणि ते परत ट्रान्झिटला आले तर त्यांना आधी काय झाले होते, कुठले उपचार आपण केलेत, किती दिवस आपल्याकडे ते पक्षी ॲडमिट होते हा सर्व रेकॉर्ड आपल्याला एका क्लिकवर मिळेल व पुढील उपचारासाठी त्याची मदतच होईल.
- कुंदन हाते, मानद वन्यजीव संरक्षक