लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टंटबाजी, हुल्लडबाजी आणि मजनूगिरीसाठी तरुणाईत कुपरिचित असलेल्या टीम फोर्टीसेव्हन (टीम-४७)च्या चार बिगडेल रईसजाद्यांनी गणराज्य दिनाच्या दिवशी वंजारीनगर फ्लाय ओव्हरवर लक्झरी कारने अक्षरशा हैदोस घातला. स्टंटबाजीच्या नावाखाली प्रचंड थरार निर्माण केला. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्यानंतर उपराजधानीतून संतापाचा सूर निघाला. या आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवण्याची मागणीही पुढे आली.
२६ जानेवारीला मुख्यमंत्री गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी येणार असल्याने तसेच त्यांना विरोध होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आपले लक्ष दुपारनंतर तिकडे केंद्रित केले होते. मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त त्या भागात नेमण्यात आला होता. त्याचा फायदा उठवत वंजारीनगर फ्लायओव्हरवर आरोपी समनसिंग (वय २०, मानकापूर) याने त्याची वेरना कार (एमएच ३१- एफए८६९), अमिन अंसारी शब्बीर अहमद (वय २०, रा. मोमिनपुरा)ने होंडा सिटी (एमएच ३१य ईयू ४२९२), अनिकेत महेंद्र माहुर्ले (वय १९) हा शेवरलेट क्रूज (एमएच १५-सीएम ३६३६) आणि सोहेल खान (वय २५, रा. जुना मानकापूर) हा क्रेटा कार (एमएच ३१- एफआर१८४७) घेऊन वंजारीनगर पुलावर आले. तेथे त्यांनी स्टंटबाजीच्या नावाखाली हैदोस घालणे सुरू केले. अत्यंत वेगाने कार चालवायची अन् धोकादायक पद्धतीने अचानक ब्रेक दाबायचा, असे ते करत होते. त्यामुळे त्यांची कार कर्कश आवाज करीत मागची पुढे (पुढचा भाग मागे) फिरत होती. विशेष म्हणजे, यावेळी त्यांचे साथीदार हो हल्ला करीत ओरडत होते आणि एक साथीदार या हुल्लडबाजीचा व्हिडीओ बनवित होता. त्यांचा हा हैदोस त्या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या काळजाचे ठोके चुकवित होता. मात्र, त्यांना विरोध करण्याचे धाडस कुणी दाखवत नव्हते. दरम्यान, या हुल्लडबाजीचा व्हिडीओ बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र संतापाचा सूर उमटला. पोलिसांनी धावपळ करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारचे क्रमांक टिपत आरोपींना हुडकून काढले.
---
चांगला धडा शिकवा
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आरोपींवर धोकादायक पद्धतीने कार चालविणे, फॅन्सी नंबरप्लेटच्या नावाखाली चालान कारवाई केली. तर, आरटीओने या सर्वच वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आरोपींचे कृत्य केवळ चालान कारवाई किंवा परवाना तात्पुरता रद्द करण्यापुरते असू नये. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे अनेक निर्दोष नागरिकांच्या, वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांना धडा शिकविला नाही तर ते भविष्यात पुन्हा असेच वागू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना कोठडीत डांबावे, अशी मागणी पुढे आली आहे.
----