योगेश पांडे
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षण विभागातील गैरप्रकारांचा भंडाफोड झाला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती केवळ विदर्भापुरती मर्यादित नसून, तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. यात अनेक मोठे मासे सहभागी असल्याचा आरोप करत या प्रकरणाची राज्यव्यापी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आ.कृपाल तुमाने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहिले आहे. ‘लोकमत’ने सातत्याने या घोटाळ्यावर प्रकाश टाकला आहे हे विशेष.
या घोटाळ्यात मंत्रालयात बसणारे सचिव स्तरावरील अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक जण सामील असल्याची विश्वसनीय माहिती माझ्याकडे आहे. सद्यस्थितीत सुरू असलेली एसआयटी चौकशी महत्त्वाची असली तरी, या घोटाळ्याची व्याप्ती आणि त्यात गुंतलेले 'मोठे मासे' पाहता, केवळ विदर्भातील चौकशी पुरेशी नाही. त्यामुळे या चौकशीची व्याप्ती वाढवून संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या सर्व शालार्थ आयडींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. असे झाले तरच घोटाळ्याचे मूळ शोधण्यास मदत होईल आणि दोषींवर कठोर कारवाई करणे शक्य होईल, असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे शासनाची प्रतिमा मलिन होते, तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होते. संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागातील पारदर्शकता सुनिश्चित करावी, असे तुमाने यांनी पत्रात नमूद केले आहे.