लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : समाेर असलेल्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली टाटा सफारी उलटली. त्यात सुदैवाने वाहनातील सातही जणांना काेणतीही दुखापत झाली नाही. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मरारवाडी शिवारात शुक्रवारी (दि. ३०) सकाळी घडली.
दाेन पुरुष, पाच महिला आणि चार मुले, असे ११ जण टाटा सफारीने (क्र. सीजी-०८/५३७६) शिवनी (मध्यप्रदेश) येथून देवलापारमार्गे नागपूरला जात हाेते. मरारवाडी शिवारात गुराखी त्याची जनावरे नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत चारत हाेता. ते मरारवाडी शिवारात पाेहाेचताच राेडवरील गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा टाटा सफारीवरील ताबा सुटला आणि वाहन राेडच्या खाली उतरले.
त्यातच टाटा सफारीचे चाक मातीत फसल्याने वाहन उलटले. त्यावेळी वाहनाचा वेग फारच कमी असल्याने वाहनातील कुणालाही दुखापत झाली नाही. परिसरातील नागरिकांनी वाहनातील सर्वांना सुखरूप बाहेर काढले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.