शासनाच्या धोरणांचा निषेध : काटोल - वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्पनरखेड : गारपीट, अवकाळी पाऊस व वादळ यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु राज्य शासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण केले नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सलील देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी भारसिंगी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काटोल-वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. सततच्या नापिकीमुळे नरखेड तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या खरीप हंगामातील पेरणीची वेळ तोंडावर आली असून, शेतकऱ्यांकडे बियाणे-खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे राज्य शासन शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत केल्याच्या वल्गना करीत असून, केवळ आकड्यांचा खेळ करीत आहे. वास्तवात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा करण्यात आला नाही, असा आरोप सलील देशमुख यांनी केला.दोन वर्षांपासून काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणात वाळली आहेत. त्या बागांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र संबंधित बागायतदारांना कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नाही. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटाव्हेटर चालविले. शासनाने सोयाबीन उत्पादकांनीही कोणतीच आर्थिक मदत केली नाही. शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढत चालले आहे. त्यातच महाबीज या शासकीय बियाणे उत्पादक कंपनीने बियाण्यांच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बियाणे उत्पादक इतर खासगी कंपन्यांनी त्यांच्या बियाण्यांच्या किमती वाढविल्या आहेत. रासायनिक खतांवर ‘व्हॅट’ लावण्यात आल्याने खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरीत्या लूट केली जात असल्याचा आरोप सलील देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारसिंगी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी रोडवर टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. शिवाय, या आंदोलनामुळे काटोल - वरुड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य प्रवीण जोध, सतीश रेवतकर, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे, वसंत चांडक, प्रकाश टेकाडे, अनुप खराडे, बाबा फिस्के, रायुकाँचे तालुका अध्यक्ष अतुल पेठे, सुधीर खडसे, मयुर उमरकर, चिंटू धोटे, गुलाम बानवा, सतीश पुंजे, नीलेश ढोरे, विनोद घोरमाडे, अक्षय ईरखेडे, प्रतीम पटोडे, निकेश धवराळ, बापू केणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जलालखेडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)कार्यक र्त्यांना अटक व सुटकाआर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना यावर्षी मोफत बियाणे व रासायनिक खतांचे वितरण करावे, संत्रा, मोसंबी व सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, जलालखेडा पोलिसांनी सलील देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना अटक करून काटोल - वरुड मार्ग मोकळा केला. या सर्व कार्यकर्त्यांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली.
भारसिंगीत ‘रास्ता रोको’ आंदोलन
By admin | Updated: June 10, 2016 03:03 IST