नागपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेले कामगार पुन्हा एकदा आपल्या गावाची वाट धरायला लागले आहेत. लॉकडाऊनमुळे काम सुटलेले, ठेकेदाराने कामावरून काढलेले, मजुरीचा पैसाही न मिळालेले आणि नियतीसह सर्वांनीच परीक्षा पाहणे सुरू केलेल्या या परप्रांतीय कामगारांनी परक्या शहरात उपासमारीत जगण्यापेक्षा ‘एकदा गड्या अपुला गाव बरा,’ असे म्हणत, पुन्हा एकदा गावाकडची वाट धरली आहे.
नागपूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील आपल्या गावांकडे हे कामगार परतीला निघाले आहेत. मागील वर्षीचा वाईट अनुभव पाठीशी असल्याने आतापासून या कामगारांनी गावाची वाट धरली आहे. नागपूर शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर कामगारांचे जत्थे सध्या दिसत आहेत. मुलाबाळांसह आणि साथीदारांसह ते निघाले आहेत.
यातील अनेक जण तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून आलेले आहेत. नागपुरात पोहोचल्यावरही अनेकांच्या नशिबी प्रतीक्षाच आहेत. २१ मार्चपासून आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या खासगी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मिळेल, त्या साधनांनी मध्य प्रदेशाच्या खवासा बॉर्डरपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेथपर्यंत पोहोचण्यासाठी बसेस नसल्याने ऑटो, टॅक्सीने जाण्यासाठी भरमसाठ भाडे त्यांना मोजावे लागत आहे.
...
खवासा बॉर्डरकडे वाढला ओघ
- महाराष्ट्र-मध्य प्रदेशाची खवासा बॉर्डर नागपूरपासून ८५ किलोमीटर आहे. खवासाकडे कामगारांचा ओघ सध्या वाढला आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र आंतराज्यीय बस फेऱ्या सध्या बंद आहेत. सीमेपर्यंत मिळेल, त्या साधनाने पोहोचून तिथून पुन्हा दुसरे वाहन शोधून त्यांचा सध्या प्रवास सुरू आहे.
- खवासा बॉर्डरपर्यंतच्या ८५ किलोमीटर अंतराचे बसभाडे साधारणत: १२० रुपयांचे आहे. मात्र, परिस्थितीचा फायदा घेऊन प्रति व्यक्ती ४०० ते ४५० रुपयांचे भाडे आकारून ऑटो, टॅक्सीचालक त्यांना पोहोचवत आहेत. नाइलाजामुळे त्यांना प्रवासावर अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे.
- २१ एप्रिलपासून मध्य प्रदेशात जाणाऱ्या खासगी, तसेच महामंडळाच्या बसेस बंद आहेत. मध्यवर्ती रेल्वे स्टेशनजवळून खासगी बसेस सुटायच्या. सध्या एकमेव शिवनीपर्यंत जाणारी ट्रॅव्हल्स बससेवा देत आहे. पुढचा प्रवास या कामगारांना आपल्या जबाबदारीवर करावा लागत आहे.
...
प्रतिक्रिया -१
वर्धा येथील एका कंपनीत बांधकामाच्या कामावर आम्ही मागील तीन महिन्यांपासून होतो. सोबत कुटुंबही होते. लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. थांबून काय करणार, ठेकेदाराला पैसा मागून पुन्हा गावाकडे निघालो आहोत.
- विवेक उईके आणि सुंदर निलमाग, पन्सीपानी, जि.मंडला (म.प्र.)
...
प्रतिक्रिया -२
तामिळनाडूमधील कोइम्बतूरमध्ये कंपनीत कामाला आहे. परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. मागच्यासारखे हाल होण्यापेक्षा लवकर आपल्या प्रांतामध्ये निघालो. कुटुंबासोबत सुखाने तरी राहील.
- सम्मीलाल वरकडे, पादरीपरपरा, जि.मंडला (म.प्र.)
...
प्रतिक्रिया -३
नागपुरातील एमआयडीसीमध्ये ठेकेदारीच्या कामावर आम्ही आठ-दहा जण आहोत. काम बंद पडले, आता काय करणार, मागच्या वेळी भरपूर हाल झाले. ठेकेदाराकडून मिळाला, तेवढा पैसा घेऊन आम्ही गावाकडे निघत आहेत.
- मदन सानी, शालीमार, पटना
...