आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन नागपूर : रुग्णांना सोयी देण्यास शासकीय रुग्णालय सक्षम नसल्याचा आरोप होत असताना गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आता रुग्णांना भरती करण्यापूर्वी ‘बेड रोल’ (चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल) देण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन बुधवारी रात्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले.नागपूर, विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेश आदी राज्यातूनही हजारो गरीब महिला रुग्ण तपासणी व प्रसूतीसाठी डागा रुग्णालयात येतात. दिवसभरात ३५ ते ४० महिलांची प्रसूती होते. या रुग्णालयात २०१३-१४ मध्ये १४ हजार ९३७ प्रसुती यशस्वी रीतीने पार पडल्या. राज्यात सर्वाधिक बाळंतपण केलेल्या या रुग्णालयाला नुकतेच पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. यात आणखी भर पडली ती ‘बेड रोल’ची. आतापर्यंत बेड रोल हे रेल्वेच्या प्रवाशांनाच मिळायचे. परंतु डागा रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्यांना मिळणार आहे. या योजनेविषयी माहिती देताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.एस. फारुकी म्हणाले, मातेच्या आरोग्याची निगा राखणे आवश्यक असते. यात स्वच्छता महत्त्वाची असते. याला घेऊनच स्वच्छ चादर, उशीचे कव्हर आणि लहान टॉवेल एका कागदी पॅकेटमधून रुग्णांना देण्यात येणार आहे. याचे उद्घाटन बुधवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते वॉर्ड क्र. ६ मधील एका महिला रुग्णाला पॅकेट देऊन झाले. यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.एस.फारुकी यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)डागाचा बाल मृत्यू दर ६.८डॉ. सावंत यांनी डागा रुग्णालयाला भेट दिली असता त्यांनी एसएनसीयू विभागात उपचार घेत असलेल्या बालरुग्णांची भेट घेतली तसेच विभागाची माहिती जाणून घेतली. राज्याच्या सरासरी बालमृत्यू दर १२ असताना डागा रुग्णालयातील बालमृत्यू दर ६.८ असल्याची माहिती यावेळी डॉ. सावंत यांना देण्यात आली
डागातील रुग्णांना मिळणार ‘बेड रोल’
By admin | Updated: February 6, 2015 00:56 IST