नागपूर : प्रवाशांसाठी महामेट्रोच्या वतीने विविध संकल्पना राबवून शहर सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. यातच सुभाषनगर येथील मेट्रोच्या पिल्लरवर स्थानिक कलावंतांच्या सहकार्याने प्रवाशांना आकर्षित करणारे फ्लेमिंगो साकारण्यात आले आहेत. हे फ्लेमिंगो मेट्रोच्या प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
महामेट्रोने शहरातील पिल्लर आणि मेट्रोचा परिसर सुंदर बनविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. मेट्रोच्या संकल्पनेनुसार सुभाषनगर येथील मेट्रोच्या पिल्लरवर ३५ फूट उंच सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. अंबाझरी तलाव, वृक्ष आणि सुंदर नैसर्गिक वातावरणात हे काम झाल्यामुळे ही कलाकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे माजी विभागप्रमुख विनोद इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक गोबरे, विजय श्रीखंडे आणि इतर ४० कलावंत ही कला साकारत आहेत. पिल्लरचे काम पूर्ण झाले असून आगामी दोन दिवसात या पिल्लरवर रोषणाई करण्यात येणार आहे. रोषणाई केल्यानंतर या पिल्लरवरील फ्लेमिंगो आणि नक्षिकामाला सुंदर स्वरूप प्राप्त होणार आहे. मध्य भारतात पहिल्यांदा अशी कलाकृती साकारण्यात आल्याची माहिती विनोद इंदूरकर यांनी दिली. हे काम कौशल्याचे असून कटिंग, एम्बॉसिंग आणि कलरिंग या तीन प्रक्रियामधून ही शिल्पकृती एमएस शीटच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. पिल्लरवर चारही बाजूंनी एकूण ४४ बगळे साकारण्यात आली आहेत.
...........
कॉटन मार्केट येथे साकारणार पोळा
भविष्यात कॉटन मार्केट येथे पोळा हा विषय घेऊन बैल, शेतकरी यांची कलाकृती साकारणार असल्याची माहिती विनोद इंदूरकर यांनी दिली. त्यांनी छत्रपतीनगर येथील पिल्लरवर उंच चढणारी माणसे साकारण्यात आली असून त्यावर ‘चलो बढे साथ साथ’ हे वाक्य अधोरेखित करण्यात आले आहे. चितार ओळीत भविष्यात मारबत साकारण्याचा विचार असल्याचे इंदूरकर म्हणाले. महामेट्रोने आणखी काम दिल्यास विविध संकल्पना साकारण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
....................