पारशिवनी : जुन्या वादातून दाेन आराेपींनी दाेघांना मारहाण करीत जखमी केले. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड येथे बुधवारी (दि. १०) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
मधू ऊर्फ प्रवीण सुरेश मेंघर (३०) व याेगेश सुरेश मेंघर दाेघेही रा. वाॅर्ड क्र. २, करंभाड, ता. पारशिवनी, अशी जखमींची नावे असून, लाला गिरी व जिजा पुरी दाेन्ही रा. करंभाड, अशी आराेपींची नावे आहेत. मधू व त्याचा माेठा भाऊ याेगेश घरी असताना, जुन्या भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारा आराेपी लाला गिरी हा त्यांच्या घरी आला व मधूच्या वहिनीला शिवीगाळ करून धक्काबुक्की करू लागला. ही बाब मधू व त्यांच्या भावाला सहन न झाल्याने जाब विचारण्यासाठी दाेघेही आराेपीच्या घरी गेले. दरम्यान, आराेपी लाला व जिजा पुरी या दाेघांनीही मधू व त्याच्या भावाला वीट फेकून व लाठीकाठीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भादंवि कलम ३२४, ३३६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार संजय शिंदे करीत आहेत.