लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत असताना पाेलीस उपनिरीक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना बुटीबाेरी परिसरात नुकतीच घडली असून, पाेलिसांनी तिघांना अटक केली.
राजेंद्र जयेंद्र कुतीरवार (१८, रा. सातगाव-रिधाेरा, ता. हिंगणा), मंगेश महेश समरीत (१८, रा. निखाडे ले-आऊट, सातगाव, ता. हिंगणा) व आकाश कृष्णा तुमडाम (२६, रा. सातगाव) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. संजय भारती हे बुटीबाेरी पाेलीस ठाण्यात पाेलीस उनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. ते शनिवारी रात्री घरी जात असताना चाैघे सुरक्षा रक्षकास मारहाण करीत असल्याची माहिती शामराव बाबूलाल कटरे यांनी संजय भारती यांना फाेनवर दिली. त्यामुळे त्यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास घटनास्थळ गाठले. या तिघांसह एक विधिसंघर्षग्रस्त बालक सुरक्षा रक्षक अरविंद भाेयर यांच्याशी भांडण करीत त्यांना मारहाण करीत असल्याचे संजय भारती यांना दिसले. त्यांनी मध्यस्थी करीत चाैघांनाही समजावून सांगत भांडण साेडविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आराेपींनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. चाैघांनीही अरविंद भाेयर यांच्यासाेबतच पाेलीस उपनिरीक्षक संजय भारती यांनी भाेयर यांनाही काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ते चाैघेही दारू पिऊन हाेते. यात संजय भारती यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी संजय भारती यांच्या तक्रारीवरून भादंवि ३५३, ३३३, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आराेपींना अटक केली व विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक आरती उघडे करीत आहेत.