वाशिम : राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राज्यभरातील सेवक येत्या ११ सप्टेंबर २0१४ रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देणार आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव भारताच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत असावे यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीच्या माध्यमातून राज्य शासनाकडे अनेकदा प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली. यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही आश्वासनाखेरीज पदरी काहीच पडले नाही. ह्यलोकमतह्णने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानं तर राज्यभर या विषयाला धरुन जनजागर झाला. यामधून शासनदरबारी दाद मागण्याचे काम सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधी व जनसामान्यांच्या माध्यमातून सुरु झाले. हा जनजागराचा लढा अधिक जागृत करण्याच्या दृष्टीने पावले उचलत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून क्रांतीदिन ९ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट २0१४ दरम्यान विदर्भातील ११ ही जिल्ह्यात क्रांतीज्योत यात्रा काढली. यामधून विदर्भातील ९0 तालुके, १७८ गावांत जनतेत २७२ ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेवून शासनाच्या उदासिनतेविषयी जनमत जागे करण्याचे काम केले गेले. क्रांतीज्योत यात्रेदरम्यानंतरही गुरुदेवप्रेमींच्या भावनांची दखल राज्य शासनाने न घेतल्याने ११ सप्टेंबर २0१४ रोजी राज्यभरातील गुरुदेवप्रेमी जनतेच्या माध्यमातून अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने धरणे देणार आहेत. वंदनीय राष्ट्रसंतांच्या स्वातंत्र्य चळवळीला आवर घालण्यासाठी इंग्रजांनी २८ ऑगस्ट १९४२ रोजी अटक करुन तुरुंगात डांबले होते. राष्ट्रसंतांनी शांतीच्या माध्यमातून क्रांती घडविण्याचे काम केल्यांनेच स्वातंत्र्यासाठी झटलेल्यांनी त्यांना राष्ट्रसंत संबोधले. आज ती मंडळी राष्ट्रपुरुषाच्या यादीत असली तरी राष्ट्रसंतांना त्यात समाविष्ट केले नाही. हे न जनमनाला न पटणारे असून आता याविषयी जनभावना तिव्र झाल्या आहेत. शासनाने याची वेळीच दखल घ्यावी, असा इशारा अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे विदर्भ प्रांत सेवाधिकारी भानुदास कराळे यांनी दिला.
सप्टेंबरला गुरुदेवभक्तांचे राज्यात ठिकठिकाणी धरणे
By admin | Updated: September 7, 2014 03:27 IST