दीपक सावंत : राज्यात २९ मृत्यू, ११३ पॉझिटिव्हनागपूर : स्वाईन फ्लूचे रुग्ण देशभरात दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहे. आतापर्यंत १४ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना जागरूक राहणाचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेनेही लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घ्यावा, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिला.गुरुवारी भंडारा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधून स्वाईन फ्लूचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी उपसंचालक आरोग्य विभागाच्या नागपूर कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून स्वाईन फ्लूची माहिती घेतली जात आहे. बुधवारी रात्री मेडिकलमध्ये बैठक घेतली. यात स्वाईन फ्लूचे जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते बाहेरच्या राज्यात जाऊन आले असल्याचे समोर आले आहे. याशिवाय हवामानातील बदल, यावर्षी थंडीने गाठलेला उच्चांक, स्वाईन फ्लूच्या विषाणूमध्ये झालेला बदल याविषयीही माहिती घेतली जात आहे. परंतु रुग्णवाढीचे अद्याप तरी अचूक कारण मिळालेले नाही. स्वाईन फ्लू रुग्णाचे ए, बी, सी, असे वर्गीकरण केले जात आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी केंद्रेही वाढविण्यात आली आहेत. आशावर्कर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या आजाराविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत एक लाख टॅम्यूफ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)सिकलसेल व किडनी प्रत्यारोपणचा जीवनदायीत समावेश!राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला येत्या मार्च महिन्यात तीन वर्षे होत आहे. आतापर्यंत या योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. किडनी प्रत्यारोपण आणि सिकलसेल रुग्णांना येणारा अडचणी लक्षात घेता या दोन्ही आजारांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन जुलैपर्यंत यात फेरबदल केले जातील, असेही डॉ. सावंत म्हणाले.
स्वाईन फ्लूविषयी जागरूक राहा
By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST