लोकमत विशेष
आनंद शर्मा
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्यासाठी निविदा काढण्यासाठी लेटलतिफी होत आहे. सप्टेंबरमध्ये निविदा निघावयास पाहिजे होती. परंतु याबाबत इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (आयआरएसडीसी) ला जुलै २०२० च्या पूर्वीच ९ मोठ्या कंपनींपासून ६ निवेदन प्राप्त झाले होते. या कंपन्या निविदा प्रक्रियेत भाग घेणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासानंतर रेल्वे प्रवाशांकडून वसूल करण्यात येणारे युझर चार्जेस आतापर्यंत ठरविण्यात न आल्याने आणि परिपत्रकसुद्धा जाहीर न झाल्यामुळे निविदा काढण्यात आली नाही. या परिपत्रकाच्या आधारेच ही निविदा काढण्यात येणार आहे. म्हणूनच आयआरएसडीसी अधिकाऱ्यांतर्फे परिपत्रकाची आतुरतेने वाट पाहण्यात येत असल्याची माहिती आहे. परंतु आरआरएसडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जानेवारीत नागपूर वर्ल्ड क्लास स्टेशनसाठी निविदा निघणार असल्याचा दावा केला आहे. आयआरएसडीसीने नागपूर स्टेशनचा पुनर्विकास (वर्ल्ड क्लास) करण्यासाठी २० नोव्हेंबर २०१७ रोजी जागतिक पातळीवर आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धा घेतली होती. त्यातील विजेता फ्रान्सची इनिया कंपनीला १९ जुलै २०१८ रोजी एका कराराच्या माध्यमातून स्टेशनचे आर्किटेक्चरल डिझाईन तयार करण्याचे काम सोपविण्यात आले. त्यानंतर आयआरएसडीसीने नागपूर, ग्वाल्हेर, अमृतसर आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासासाठी डिसेंबर २०१९ मध्ये अर्ज मागविले होते. हे अर्ज २५ जून २०२० रोजी उघडण्यात आले. यात ९ मोठ्या कंपन्यांनी नागपूर स्थानकाच्या पुनर्विकासाचे कंत्राट मिळविण्यासाठी वेगवेगळे सहा अर्ज आयआरएसडीसीला दिले आहेत. नागपूर स्थानकाच्या पुनर्विकासाचा खर्च ३७२ कोटी रुपये आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे आणि आयआरएसडीसी दरम्यान कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
............
जानेवारीत निघणार निविदा
‘इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनच्या वतीने मध्य रेल्वे नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया जानेवारी २०२० मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.’
-एस. के. लोहिया, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयआरएसडीसी
..........