लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : टाेल नाक्यावर पावती घेताना रांगेतील वाहनाला दुसऱ्या वाहनाचा मागून धक्का लागला आणि वाद उद्भवला. हा वाद विकाेपास केल्याने काहींनी टाेल नाक्याची ताेडफाेड करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाेरखेडी (रेल्वे) (ता. नागपूर ग्रामीण) शिवारात बुधवारी (दि. २३) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाचे चाैपदरीकरण करण्यात आले असून, या मार्गावरील बाेरखेडी (रेल्वे) शिवारात ओरिएन्टल कन्स्ट्रक्शन कंपनीचा टाेल नाका तयार करण्यात आला आहे. या नाक्यावर टाेल टॅक्स देऊन पावती घेण्यासाठी राेज दाेन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. एमएच-४०/बीजे-०७३२ क्रमांकाचे वाहन रांगेत उभे असताना मागून आलेल्या एमएच-३१/ईके-८४५४ क्रमांकाच्या तवेराचा त्या वाहनाला धक्का लागला. त्यामुळे दाेन्ही वाहनांच्या चालकांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. त्यानंतर वाद मिटला आणि दाेन्ही वाहनचालक वाहनांसह तिथून निघून गेले.
काही वेळाने तवेरा चालकाने १०-१२ जणांना घेऊन पुन्हा टाेल नाका गाठला. त्या सर्वांनी काही कळण्याच्या आत टाेल नाक्यावरील साहित्याची ताेडफाेड करायला सुरुवात केली. यात नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे कळू शकले नाही. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी सुवरवायझर प्रतीक शिशुपाल नारनवरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, ३२३, ४२७ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्ताे पाेलिसांनी आराेपीस अटक केली नव्हती किंवा त्यांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले नव्हते. या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक ए. डी. माेरखडे करीत आहेत.
....
जीवे मारण्याची धमकी
आराेपींनी टाेल नाक्यातील कॉम्प्युटर व इतर साहित्याची ताेडफाेड केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करीत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. हा संपूर्ण घटनाक्रम टाेल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.