नागपूर : वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बंधक बनवून दरोडा टाकणाऱ्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील दोन सदस्य पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांना रायपूरवरून नागपुरात आणण्यात आले. मो. इमरुल मो. साबीर खान (३२) आणि शनवर ऊर्फ मो. खलिद हक (२५) दोघेही बांगलादेश बागेरेहाट येथील रहिवासी आहेत. २९ आॅगस्ट रोजी ८ ते १० दरोडेखोरांनी सोनेगाव येथील बालकृष्ण मोगरे व त्यांची पत्नी आणि मुलीला बंधक बनवून दोन लाख रुपयांचा माल लुटून नेला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. दरम्यान रायपूर पोलिसांनी दरोड्यातील एका प्रकरणात आरोपींना अटक केली. त्यांनी साथीदारांच्या मदतीने सोनेगाव परिसरात दरोडा टाकण्याची कबुली दिली. इतर साथीदार बांगलादेशात पळून गेल्याचे सांगितले. रायपूर पोलिसांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींनाा नागपुरात आणण्यात आले. या टोळीत एक डझनपेक्षा अधिक सदस्य आहेत. सर्व बांगलादेशचे रहिवासी आहेत. ते अवैधपणे भारतीय सीमेत प्रवेश करतात. रेल्वेने देशातील मोठमोठ्या शहरात जातात. शहरात जाताना ते स्टेशनवर न उतरता स्टेशनपासून काही दूर अंतरावर उतरून रेल्वे रुळाने वस्त्यांमध्ये प्रवेश करतात. एखादा बंगला दिसून येताच दरोडा टाकतात. दरोडा टाकल्यावर रुळावरूनच ते स्टेशनवर परत येतात आणि तेथून कुठल्याही रेल्वेने दुसऱ्या शहरात निघून जातात. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. दरोड्याच्या घटनेची माहिती होताच पोलीस शहरात तपासणी करतात. पोलीस स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच आरोपी रवाना होतात.यामुळे ही टोळी पोलिसांच्या हाती लागली नव्हती. या बांगलादेशी टोळीने अनेक शहरांमध्ये दरोडा टाकला आहे. त्यांचे साथीदार बांगलादेशात परत गेल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अरुण जगताप, एपीआय ई.बी. पाटील, हवालदार संजय गुप्ता, राजेश काकडे, शिपाशी ज्ञानेश्वर बांते करीत आहेत. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ४स्टेशनवर संशयास्पद लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफ तैनात असतात. रेल्वे रुळावर पायीसुद्धा गस्त होत असते. असे असतानाही त्यांच्या हाती कधीच मोठी टोळी लागलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असामाजिक तत्त्वसुद्धा मोठमोठ्या घटना घडवून अशाचप्रकारे फरार होतात.
बांगलादेशी दरोडेखोर टोळी अडकली
By admin | Updated: November 5, 2015 03:29 IST