नागपूर : प्रवासात पती-पत्नीला गुंगीचे औषध देऊन त्यांची २.४६ लाखाचा मुद्देमाल असलेली काळ्या रंगाची सुटकेस पळविल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शाम बद्रिप्रसाद माहेश्वरी (६१) रा. रायपूर हे रेल्वेगाडी क्रमांक १२८०८ विशाखापट्टणम समता एक्स्प्रेसमध्ये कोच क्रमांक ए-२, बर्थ ३७, ३९ वरून आपल्या पत्नीसह हजरत निजामुद्दीन ते रायपूर असा प्रवास करीत होते. त्यांच्या शेजारीच बसलेल्या एका व्यक्तीने त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध दिले. ते झोपी जाताच संबंधित व्यक्तीने त्यांची २.४६ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची सुटकेस पळविली. सुटकेसमध्ये सोन्याचे मंगळसुत्र १२ ग्रॅम किंमत ३० हजार, सोन्याचे कंगन ६० ग्रॅम किंमत १.५० लाख, सोन्याची अंगठी ५ ग्रॅम किंमत १४ हजार, मोटोरोला आणि सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल किंमत १४ हजार, कोट १२ हजार, रोख १३ हजार असा एकूण २ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल होता. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना आपली सुटकेस चोरीला गेल्याचे समजले. परंतू पती-पत्नी गुंगीत असल्यामुळे आधी त्यांनी धंतोलीतील केअर हॉस्पिटल गाठून तेथे उपचार घेतले. त्यानंतर नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची कुख्यात सानू ठरतोय डोकेदुखीनागपूर : न्यायालय सुरक्षेसाठी तैनात पोलिसांची आणि कारागृहातून आरोपींची ने-आण करणाऱ्या मुख्यालय पोलिसांची कुख्यात ‘चेन स्नॅचर’ मोहम्मद सानू ऊर्फ मुस्तफाखान पठाण हा डोकेदुखी ठरत आहे. सानू आणि त्याचा भाऊ मंजूरखान पठाण हे चेनस्नॅचर (मंगळसूत्र पळवे) टोळीचे म्होरके आहेत. या दोघांसह मिलिंद ऊर्फ बाल्या मेश्राम, सुरेंद्र बानाबाकोडे आणि मोहम्मद तन्वीर ऊर्फ जहीर अजहर यांच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करून ११ एप्रिल २०१४ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आज सानू आणि टोळी सदस्यांना कारागृहातून नियमित पेशीसाठी न्यायालयात आणण्यात आले होते. तेव्हा सानू याने न्यायालय सुरक्षा पोलिसांवर घरचा डबा पुरवण्यावर दबाव आणला. आपणास बिर्याणी-चिकन पाहिजे. ते पुरवले नाही तर आपण स्वत:चे डोके फोडून घेऊन फसवण्याची धमकीही त्याने या पोलिसांना दिली. सानूला जेव्हाही न्यायालयात आणले जाते तेव्हा तो पोलिसांवर दबाव टाकत असतो. यापूर्वीही त्याने अनेकदा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा सानूने धमकी नाट्य सुरू केल्याने पोलीस वेगळ्याच विवंचनेत सापडले आहेत. सानू हा कुख्यात चेन स्नॅचर आहे. कधी मोमीनपुरा, गिट्टीखदान तर कधी यशोदऱ्यातील टिपू सुलतान चौक हे त्याचे वास्तव्य आहे. कारागृहातून बाहेर पडताच तो मंगळसूत्र पळवण्याच्या गुन्हेगारीत सक्रिय होतो. त्याच्याविरुद्ध ३२ प्रकरणे दाखल आहेत. काही प्रकरणातून तो सबळ पुराव्याअभावी निर्दोषही ठरलेला आहे. (प्रतिनिधी)
गुंगीचे औषध देऊन बॅग पळविली
By admin | Updated: November 8, 2014 02:49 IST