परिसंवाद : मनोज संसारे यांचे प्रतिपादन नागपूर : ज्यांना डॉ. बाबासाहेब समजले नाही, त्यांना रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजूच शकत नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाची जी अधोगती झाली, ती रिपब्लिकन तत्त्वज्ञान स्वीकारले नाही, म्हणून झाली, असे मी मानत नाही. रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजण्यासाठी अगोदर आंबेडकरांना समजून घेणे आवश्यक आहे. मात्र आंबेडकरी जनतेने डॉ. आंबेडकरांचा केवळ जगण्यापुरता विचार केला आहे. त्यांना कधीही समजून घेतलेले नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी परिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मनोज संसारे यांनी केले. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने ‘रिपब्लिकन तत्त्वज्ञान न स्वीकारल्यामुळे आंबेडकरी समाजाची अवनती’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. सीताबर्डी येथील हिंदी मोर भवनच्या सभागृहात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील खोब्रागडे होते. मंचावर आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, परमानंद रामटेके, मेघराज काटकर, माणिकलाल बंबार्डे, जिंदा भगत व आर. आर. घोडेस्वार उपस्थित होते. संसारे पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेला रिपब्लिकन विचार समजला असता, तर आज आमच्या घराचे शंभर तुकडे झाले नसते. समाजाने बाबासाहेबांचा केवळ जगण्यासाठी उपयोग केला आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, असे सांगितले. त्यानुसार आम्ही शिकलो. नोकऱ्या मिळविल्या. मोठे झालो. पैसा मिळविला. पण सर्वकाही केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी. त्या शिक्षणाचा समाजासाठी कोणताही उपयोग केला नाही. आंबेडकरी लोकांनीच रिपब्लिकन पक्षाला खुजे करण्याचे काम केले आहे. यातून समाजाची खरी अधोगती झाली आहे. पण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील खरा रिपब्लिकन पक्ष उभा करू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)
आंबेडकरी जनतेला बाबासाहेब समजलेच नाही
By admin | Updated: August 25, 2014 01:15 IST