- विद्यार्थ्यांचा आरोप : कोरोना संक्रमणाने उडविला ऑनलाईन एज्युकेशनचा फज्जा
- ‘एमसीक्यू’ पेपर काढताना गुणोत्तर साधण्यात सेटर-मॉडरेटर यांना अपयश
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या मराठी साहित्य विषयाचा पेपर शुक्रवारी (दि. ९) पार पडला. ४० प्रश्न असलेल्या या पेपरमध्ये अर्धेअधिक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे उतरल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. विशेष म्हणजे, वर्णनात्मक प्रश्नोत्तरांची सवय असलेल्या विद्यार्थ्यांना पर्यायवाचक प्रश्न उतरल्याने, ते सोडविताना गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे. नेमका असाच गोंधळ पेपर काढताना पेपरसेटर व मॉडरेटर यांचाही उडालेला दिसून येतो. त्याच कारणाने, प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न आउट ऑफ सिलॅबस की शिकविण्यात न आलेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बी.ए. द्वितीय वर्षाच्या मराठी साहित्याचा पेपर हा वर्णनात्मक शैलीचा असतो. ८० गुण असलेल्या या पेपरमध्ये दोन प्रश्न प्रदीर्घ स्वरूपाचे, प्रत्येक १६ मार्काचे असतात. उर्वरित तीन प्रश्न लघुत्तरी स्वरूपात चार लहान-लहान उपप्रश्नांत प्रत्येकी चार गुणांचे असतात. यात नियमानुसार अभ्यासक्रमातील संत तुकारामांच्या अभंगांवर ५६ गुण, तर काव्यरसशास्त्रावर २४ गुण असतात. यंदा कोरोना संक्रमणाच्या काळामुळे हा पेपर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. त्यामुळे, वर्णनात्मक शैलीऐवजी पर्यायवाचक किंवा बहुपर्यायी अर्थात मल्टिपल चॉईस क्वेश्चन (एमसीक्यू) स्वरूपात हा पेपर अभ्यासमंडळाच्या पेपरसेटर व मॉडरेटरनी तयार केला. ४० प्रश्न प्रत्येकी २ गुणांचे अशा एकूण ८० गुणांचा हा पेपर काढला गेला. यात २८ प्रश्न संत तुकारामांवर, तर १२ प्रश्न काव्यशास्त्रावर असावेत, असा नियम होता. शिवाय, अभ्यासक्रमातील नियोजित चार घटकांवर प्रत्येकी १० प्रश्न येणे बंधनकारक होते. मात्र, यातील गुणोत्तर साधण्यात पेपरसेटर व मॉडरेटर यांचा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय, वर्षभरापासून सुरू असलेल्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये बरेच घटक शिकवण्यात आलेले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच, पेपर सोडविताना आलेले अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना अनोळखी वाटल्याने मुलांना प्रश्नांची उत्तरे साेडविता आलेली नाहीत. त्यामुळेच, मुलांनी आऊट ऑफ सिलॅबस पेपर उतरल्याचा आरोप केला आहे.
------------------
तुकारामांचे अभंग, तुकारामांच्या निवड अभंगांचा अभ्यास व समीक्षण अशा तीन युनिटचा समावेश यंदा अभ्यासक्रमात होता. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेकांचा गोंधळ उडालेला आहे. नेटवर्क समस्या, साधे मोबाईल आदी समस्यांमुळे अनेक विद्यार्थी बरेचदा कनेक्ट होऊ शकले नसावेत. शिवाय, काही शिक्षकांनी अपेक्षित विषयावरच भर दिला असावा. त्यामुळे, मुलांना पेपर सोडविताना अनेक प्रश्न अनोळखी वाटले असावे. मात्र, पेपर आऊट ऑफ सिलॅबस नव्हता. सगळे प्रश्न अभ्यासक्रमातूनच आलेले आहेत.
- डॉ. मनीषा नागपुरे, मराठी विषयाचे प्राध्यापक : पीडब्ल्यूएस कॉलेज, नागपूर
-----------------
अभ्यासमंडळाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमावर पेपर निघायला हवा. पेपर सेट केल्यावर मॉडरेटर ते तपासतात. मात्र, त्यात चुका असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. याबाबत काही मुलांच्या तक्रारीही आल्या आहेत. अभ्यास मंडळ याकडे लक्ष पुरवेल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. राजेंद्र वाटाणे, मराठी विषाचे प्राध्यापक : तायवाडे कॉलेज, कोराडी
----------------
अभ्यासक्रमात तुकारामाच्या अभंगांवर १० ते १२ प्रश्नच उतरले. मात्र, जे अभ्यासक्रमात नव्हते अशा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्यावर प्रश्न उतरले. वि.स. खांडेकरांबाबत अभ्यासक्रमात नसलेला प्रश्नही होता. तसेच मोमेटाचे काव्यप्रकार किती या प्रश्नाला योग्य उत्तराचा पर्याय दिलाच नव्हता. त्यामुळे, सगळ्याच प्रश्नांवर अंदाजे टोले मारण्यावरच भर दिला. याबाबत आमच्या शिक्षकांकडे तक्रार केली आहे.
- रसिका भगत व प्रशांत पिल्लेवान, विद्यार्थी : बी.ए. द्वितिय (मराठी साहित्य)
---------------