नागपूर : दहा चिमुकले बसून असलेल्या स्कूल व्हॅनला एका ट्रकने कट मारला. या व्हॅनमध्ये गॅस सिलिंडर होते. स्कूल व्हॅनचालक आणि ट्रकचालक या दोघांच्याही निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून संभाव्य मोठी दुर्घटना टळली. एमएच ४९/ जे०२३१ क्रमांकाच्या स्कूल व्हॅन चालकाने खापरीतून नागपूरकडे जाताना कसलेही संकेत न देता एका बाजूने अचानक रस्त्यावर वाहन आणले. याचवेळी नांदेडहून नागपूरकडे भरधाव ट्रक (एमएच २६/ एन ८३४६) येत होता. अचानक व्हॅन समोर आल्यामुळे वाहनचालकाने कसेबसे नियंत्रण राखत ट्रक दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागच्या बाजूने व्हॅनला हलका कट लागला. त्यामुळे व्हॅनचे किरकोळ नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पळू लागला. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि सोनेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी ट्रकचालक रोहिदास नागोराव पोले (वय २६, रा. नांदेड) याला अटक केली.तक्रार देण्यास टाळाटाळया ट्रकमध्ये नांदेड आणि आजूबाजूचे काही तरुण होते. सीआरपीएफच्या भरतीसाठी ते नागपुरात येत होते, अशी माहिती पुढे आली. दरम्यान, घटनेच्या वेळी व्हॅनमध्ये दहा चिमुकले होते. या व्हॅनमध्ये गॅस सिलिंडर असल्याचे आणि जोरात धडक लागली असती तर भयंकर दुर्घटना झाली असती असे आरोपी वाहनचालक ओरडून ओरडून सांगत होता. अपघातानंतर तक्रार देण्यास मात्र व्हॅनचालकाने टाळाटाळ केल्याचे पोलीस सांगत होते.
खापरीत आक्रित टळले
By admin | Updated: October 14, 2015 03:14 IST