नागपूर : अत्यंत वेगवान झालेल्या जगामध्ये खूप मोठे ग्रंथ वाचनाची सवय कमी होत आहे. यापुढे लेखकांनी सामान्य व हृदयाला भिडणाऱ्या शब्दांच्या भाषेत लेखन करण्याची गरज आहे. हल्ली विमान किंवा मेट्रोचा प्रवास हा एक-दोन तासातच संपतो. अशावेळी वाचकाला छोट्या ग्रंथाची आवश्यकता भासते आणि ती आपण त्याला देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद माने यांनी येथे केले.संविधान चौकस्थित वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुकवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, डॉ. इंद्रजित ओरके, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास टेभुर्णे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, कविता महाजन, अश्विनी दिवाण, रत्नाकर नलावडे, सुनील पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रंथातील प्रत्येक शब्द व शब्दातील प्रत्येक भाव वाचकाला खिळवून ठेवण्यास सक्षम असला पाहिजे. असे प्रभावी साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. लेखकांच्या कल्पनाही स्पष्ट असाव्यात. समाजाला त्या लेखकाला काय संदेश द्यायचा आहे याची स्पष्ट जाणीवही त्यांना असावी. तरच ग्रंथ चळवळ वाढीस लागेल यात तिळमात्र शंका नाही, असेही डॉ. माने म्हणाले. वाचन संस्कृतीमध्ये महाराष्ट्रापेक्षा पश्चिम बंगाल अग्रेसर आहे. तेथे पुस्तकांची निर्मिती, विक्री मोठ्या प्रमाणात असते. तेथील ग्रंथोत्सवाचे स्वरूप व्यापक असते. तेव्हा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात नवोदित लेखक आणि कवींना व्यासपीठ मिळायला हवे. यामुळे ग्रंथोत्सवाच्या स्वरूपात व्यापकता येईल, असे विचार देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले. समारोप समारंभापूर्वी नागपूर जिल्हा ग्रंथोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘मराठी ग्रंथातील मानवी जीवन’ या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी पी. डब्ल्यू. एस. कॉलेज मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. इंद्रजित ओरके होते तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यापीठ मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेंद्र लेंडे आणि मॉरिस कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. जनार्दन काटकर होते.(प्रतिनिधी)
लेखकांनी छोट्या ग्रंथांची निर्मिती करावी
By admin | Updated: January 30, 2016 03:17 IST