नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दिल्लीच्या रोहिणी कोर्टात शुक्रवारी झालेल्या ‘शूटआऊट’चे सर्वत्र गंभीर पडसाद उमटले आहेत. या घटनेला दिल्ली पोलिसांचे फेल्युअर मानले जात असताना सुरक्षा व्यवस्थेवरही ‘नाकामी’चा ठपका ठेवण्यात आला आहे. राज्यात मात्र या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, ठिकठिकाणच्या न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्यात आले आहे. नागपुरात सोमवारपासून सर्व न्यायालयात नवीन सुरक्षा व्यवस्था अमलात येणार आहे.
दिल्लीच्या रोहिणी कोर्टात तेथील गँगस्टर जितेंद्र ऊर्फ गोगी याच्यावर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी गोळीबार करून त्याची हत्या केली, तर गोगीची हत्या करणाऱ्यांचे दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर करून त्यांना ठार मारले. विशेष म्हणजे, गोगीचा गेम करणारे आरोपी वकिलाच्या वेशात न्यायालयात पोहचले होते, हे एकदाचे समजण्यासारखे असले तरी त्यांच्याजवळ लोडेड पिस्तूल होत्या आणि रोहिणी कोर्टाच्या प्रवेशद्वारावर मेटल तसेच लायडिटेक्टर असताना गोगीचे मारेकरी बिनबोभाट आतमध्ये पोहचले. त्यातून दिल्लीच्या रोहिणी कोर्टाची सुरक्षा व्यवस्था किती तकलादू होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यावर चोहोबाजूने टीकेची झोडही उठली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील ठिकठिकाणच्या न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, आधीपेक्षा अधिक चांगली सुरक्षा व्यवस्था कशी उभारण्यात येईल, यासंबंधाने पोलीस महासंचालनालयात मंथन करण्यात आले. यासंबंधाने राज्यातील सर्वोच्च न्यायालयापासून तो जिल्हा न्यायालयात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्रसिंग यांनी लोकमतला सांगितले. त्यासाठी जवळपास १५०० पोलीस (अधिकारी, कर्मचारी) नियुक्त करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
---
नागपुरातील न्यायालयात दोन हत्याकांड
नागपुरातील न्यायालयात १९ जून २००२ ला पिंटू शिर्के नामक गुन्हेगाराची पेशी होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले होते. आरोपी विजय मते, राजू भद्रे आणि साथीदारांनी भर न्यायालयात पिंटू शिर्केवर ५० पेक्षा जास्त घाव घालून त्याची हत्या केली होती. तर, त्यानंतर न्यायालयातच १३ ऑगस्ट २००३ ला अक्कू हत्याकांड घडले होते.
---
नागपुरात सोमवारपासून ‘चाक चाैबंद’
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्लीच्या घटनेनंतर शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागपुरातील सध्याची न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था जाणून घेतली. त्यानंतर आहे त्यापेक्षा अधिक चांगली सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले. सोमवारपासून नागपुरातील सर्व न्यायालयात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाणार असून, न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत कसलीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले.
---