नागपूर : कुष्ठरोग्यांच्या वेदनेशी नाते जोडण्याच्या प्रयत्न या चित्राच्या माध्यमातून झाला आहे. तसे पाहता बाबांच्या कविता समजायला कठीण आहेत, हा मोठ्यांचा समज मुलांनी चक्क चुकीचा ठरविला आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी येथे केले.बालचित्रकारांच्या बसोली ग्रुप आपल्या कला अभिव्यक्तीचे ४० वे वर्ष साजरे करीत आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून बसोलीच्या ७५ बालचित्रकारांनी बाबा आमटे यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ या काव्यसंग्रहातील निवडक दीर्घ कवितांवर आधारीत रंगभूषेच्या माध्यमातून आपली चित्र अभिव्यक्ती सादर केली. रविवारी लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या छोट्या गॅलरीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून बालचित्रकार कस्तुरी भाकरे व बसोलीचे चंद्रकांत चन्ने उपस्थित होते.डॉ. आमटे म्हणाले, बाबांच्या कवितेमधील चिंतन बालचित्रकारांच्या कॅनव्हासमधून समोर आले आहे. बाबा वास्तविक इतके सहज आणि सोपे होते हे बसोलीच्या मुलांनी सहज सिद्ध करून दाखविले. बाबांच्या कवितेला अनेक प्रसिद्ध साहित्यिक आणि कवींनी दाद दिली. ते बाबांना नेहमी भेटण्यास आनंदवनात यायचे. आता तुम्ही बाबांच्या कवितांशी जुळल्याने तुम्ही आनंदवनाला भेट देण्यासाठी या, असे आवाहनही त्यांनी केले.चंद्रकांत चन्ने म्हणाले, बाबांच्या दीर्घ कविता संग्रहातील ज्या ज्या कविता बालकांना भावल्या त्यातील कधी एकच कडवे, तर कधी दोन तर कधी फक्त एक किंवा दोन ओळींवर बालकरांनी आपली अभिव्यक्ती सादर केली. कॅन्व्हासवरील बेफाम रंग, रेषा आणि आकार, कधी वास्तविक तर कधी अमूर्त वाटणारे, परंतु बालमनाची सहजवृत्ती जपणारे ही चित्रे बसोलीच्या आजवरच्या बालचित्र प्रक्रियेत भर टाकणारी आहेत, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक समीर हेजीब यांनी केले. हे प्रदर्शन दुपारी ४ ते रात्री ८.३० वाजतापर्यंत २५ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विशेष म्हणजे, बालचित्रकारांचे हे चित्र विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून गोळा होणारा निधी महारोगी सेवा समिती, आनंदवन यांना देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
कुष्ठरोग्यांच्या वेदनेशी नातं जोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 23, 2015 02:43 IST