नागपूर : सक्करदरा चौकामध्ये रात्री चालानची कारवाई करणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला कारचालक युवकाने उडविण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्यासाठी पोलीस कारच्या बोनेटवर बसला, तरीही कार न थांबविता युवकाने एक किलोमीटर त्याला घासत नेले. नागरिकांनी धाव घेऊन हा प्रकार थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक प्रतापनगरातील गंगाकाशी अपार्टमेंट येथे राहणारा असून, त्याचे नाव आकाश उत्तम चव्हाण आहे, तर पोलीस शिपायाचे नाव अमोल सिद्दमवार आहे. सिद्दमवार रविवारी रात्री सक्करदरा चौकात ड्युटीवर होते. रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान एमएच ३१ डीव्ही ३२२२ क्रमांकाची कार येताना दिसली. ही कार आकाश चालवीत होता, तर बाजूच्या सीटवर पल्लवी नामक युवती बसलेली होती. कारच्या काचांवर काळी फिल्म असल्याने अमोलने कार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाने कार थांबविण्याऐवजी थेट अंगावर नेली. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी पोलीस कारच्या बोनेटवर बसला. अशाही स्थितीत अमोलने कार वेगाने पुढे दामटत नेली. छोटा ताजबागच्या दिशेने जात असताना सिग्नलवर उभ्या असणाऱ्या दोघांना धडकही दिली. हा प्रकार पाहून नागरिक सतर्क झाले. त्यांनी धाव घेऊन कार थांबविण्याचा प्रयत्न केला. छोटा ताजबागजवळ ही कार थांबविण्यात नागिरकांना यश आले.