मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले.
मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील हल्लेखोर वाघीण गोरेवाडा प्राणीसंग्रहलयात दाखल
ठळक मुद्देदोघांचा घेतला होता बळी : रेस्क्यु टिमने केले जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले. दोन जणांचा बळी घेऊन एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या या वाघिणीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गोलाई या गावाजवळील जंगलात रेस्क्यु टिमने रविवारी सायंकाळी जेरबंद केले होते. ही वाघीण ब्रह्मपुरी वनविभागातील आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्र परिसरात या वाघिणीचा बराच उपसर्ग वाढल्याने तिला ३१ मे रोजी तेथून पकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डोलार येथील कोअर झोनमध्ये सोडण्यात आले होेते. तिला बसविण्यात आलेल्या कॉलर आयडी नुसार ‘ई-१’ हा क्रमांक असल्याने या नावानेच ती वनविभागामध्ये ओळखली जाते.मागील दोन महिन्यांच्या काळामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वावरताना तिने दोघांवर हल्ला करून ठार केले होते. २ जुलैच्या रात्री केकदाखेडा गावातील सात वर्षांच्या मुलीवर हल्ला केला होता. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला केला होता. ३०ऑगस्टला सायंकाळी दादरा गावातील शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला करून ठार केले होते. या घटनेनंतर वाघिणीच्या शोधात निघालेल्या गावकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात दिलीप चव्हाण जखमी झाले होते.गावकरी संतप्त झाल्याने प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी वाघिणीला पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३१ ऑगस्टला चमू निघाली. मात्र पहिल्या दिवशी वाघिणीऐवजी संतप्त गावकऱ्यांचाच सामना त्यांना करावा लागला. त्यामुळे चमू परत आली. दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबरच्या सायंकाळी इंजेक्शन देऊन बेशद्ध करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मेळघाट प्रकल्पात आणून उपचार करण्यात आले. २ सप्टेंबरला सायंकाळी कडेकोट बंदोबस्तात या वाघिणीची रवानगी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात करण्यात आली. य वाहनांचा ताफा सायंकाळी गोरेवाडा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दाखल झाला. वैद्यकीय तपासण्यांनंतर तिला बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.