लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सिक्युरिटी एजन्सी चालकाला तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्तालयातील सहायक आयुक्त योगेश वासुदेव बाकरे (वय ४४) याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
फिर्यादी यांची सिक्युरिटी गार्ड एजन्सी असून, त्यांच्या एजन्सीचे ९.४६ लाखांचे बिल अडकून होते. ते मिळावे म्हणून अधिकाऱ्यांकडे अनेकदा चकरा मारल्यानंतर फिर्यादींनी अखेर वस्त्रोद्योग आयुक्तांचा पीए नितीन सुरेश वर्मा (वय ५७, टांगा स्टॅण्ड) याची भेट घेतली. ते काढून देण्यासाठी वर्माने ७ लाखांची लाच मागितली होती. लाच द्यायची नसल्याने फिर्यादीने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. चाैकशीनंतर या प्रकरणात ११ नोव्हेंबर २०२० ला एसीबीने कारवाई करून वर्माच्या मुसक्या आवळल्या होत्या. या गुन्ह्याची चौकशी सुरू होती. त्यात सहायक आयुक्त योगेश बाकरेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तीन लाखांची लाच बाकरेने मागितल्याचे सबळ पुरावे एसीबीच्या पथकाला मिळाले. त्यावरून एसीबीच्या पथकाने या प्रकरणात आरोपी बाकरेला सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा २७ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला.