नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीला मुलाच्या लग्नासाठी १५ दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी हा निर्णय दिला. रजेदरम्यान प्रत्येक दुसऱ्या दिवसी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी असे निर्देश गवळीला देण्यात आले आहेत. गवळीचा मुलगा महेशचे ९ मे रोजी मुंबईत लग्न आहे. गवळीची सून नागपुरातील असून ती एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. गवळीला काही दिवसांपूर्वीच नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याने नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता.गवळीला पॅरोलवर सोडल्यास दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेता विभागीय आयुक्तांनी २३ एप्रिल रोजी अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाविरुद्ध गवळीने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. विभागीय आयुक्तांनी सारासार विचार न करता पॅरोलचा अर्ज फेटाळला. त्यांनी दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली पण, कोणता गुन्हा घडेल याबाबत काहीच स्पष्ट केले नाही.गवळीची वागणूक चांगली असून तो शांततेत शिक्षा भोगत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. गवळीतर्फे अॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
अरुण गवळीला पॅरोल मंजूर
By admin | Updated: May 1, 2015 02:34 IST