लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : उमरेड तालुक्यात कृषिपंप धारकांची संख्या ५७८८ इतकी आहे. एकूण २९ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. सुमारे दीड महिन्यांपासून विद्युत विभागाचा थकबाकी वसुलीसाठी ससेमिरा सुरू आहे. शासनाच्या ‘कृषी वीज बिल माफी योजना २०२०’ अंतर्गत आतापर्यंत ४५४ कृषिपंप धारकांनी ५४ लाख ८८ हजार रुपयांचा भरणा केलेला आहे. वीज कापणीचाही सपाटा सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.
अशातच मंगळवारी विधानसभेत या गंभीर विषयांवर गरमागरम चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरगुती आणि कृषिपंप वीज कनेक्शन कापले जाणार नाही, असे स्पष्ट केले. यामुळे असंख्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आता वीज बिल थकबाकीबाबत शासनाच्या पुढील धोरणाकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
कृषी वीज बिल माफी योजनेत ६६ टक्के विद्युत बिल माफ होते. यामध्ये सप्टेंबर २०१५ च्या पूर्वीपासून थकबाकी असणाऱ्यांना व्याज व विलंब आकार माफ तसेच एकूण मुद्दल रकमेच्या ५० टक्के रकमेचा भरणा कृषिपंप धारकांना करावयाचा आहे. सप्टेंबर २०१५ नंतरची थकबाकी असणाऱ्यांना विलंब आकार पूर्ण माफ व व्याजमाफी ५० टक्के, अशी ही योजना जाहीर करण्यात आली होती. सोबतच कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांसाठीही ३० टक्के रकमेचा भरणा करीत वीज पूर्ववत सुरू करण्याचीही योजना सुरू आहे. शिवाय रक्कम वसुलीच्या ३३ टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीअंतर्गत विद्युत सुधारणेसाठी वापरली जाणार आहे.