लाेकमत न्यूज नेटवर्क
बडेगाव/खापा : धारदार शस्त्राने वार करीत खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आराेपींनी मृतदेह जंगलात फेकला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खेकरानाला मार्गावरील महारकुंड शिवारात मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, घटनेच्या १२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचा उलगडा करीत दाेन आराेपींना ताब्यात घेत अटक केली आहे.
पवन पांडुरंग चाैधरी (२१, रा. थडीपवनी, ता. नरखेड, हल्ली मु. शताब्दी चाैकाजवळ, अजनी, नागपूर) व सीमा प्रदीप बागडे (४०, रा. अजनी, नागपूर), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे असून, प्रदीप जनार्दन बागडे (४७, रा. अजनी, नागपूर), असे मृताचे नाव आहे. मृत प्रदीप हा पत्नी सीमाला वारंवार मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने प्रदीपला जिवे मारण्याकरिता आराेपी पवन चाैधरी यास सांगून त्या माेबदल्यात राेख रक्कम व एक प्लाॅट मिळवून देण्याचे आश्वासन तिने दिले हाेते. दरम्यान, आराेपी पवनने एका अल्पवयीन साथीदारासह प्रदीपचा खून करण्याचा डाव आखला. थडीपवनी परिसरात प्राॅपर्टी पाहण्याच्या बहाण्याने आराेपीने साथीदारासह आपल्या एमएच-४९/यू-७२०७ क्रमांकाच्या कारने त्याला नागपूर- अमरावती मार्गाने थडीपवनी परिसरात नेले. तिथेच आराेपीने धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. प्रदीपचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर आराेपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकल्याची कबुली पाेलिसांना दिली. मृताची पत्नी सीमा हिच्या सांगण्यावरून आपण हे कृत्य केल्याचेही आराेपीने पाेलिसांना सांगितले. दुसरीकडे मृत प्रदीप याच्याविरुद्ध पाेलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे प्राॅपर्टीच्या वादातूनही त्याचा खून केला असावा, अशी शक्यता व्यक्त हाेत असून, त्या दिशेने पाेलीस तपास करीत आहेत.
याप्रकरणी खापा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, दाेन आराेपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार अजय मानकर करीत आहेत.