सावनेर तालुक्यातील प्रकार : पॉवरग्रीडकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सावनेर : तालुक्यातील भेंडाळा, गोसेवाडी, आजनी शेरडी, खानगाव, खुरजगाव, मंगसा, सालई या भागात पॉवरग्रीड कंपनीकडून टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. मात्र यासाठी कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना आणि मोबदला न देता काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून कंपनीविरुद्ध आता शेतकऱ्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य मोबदला न दिल्यास काम होऊ देणार नाही, असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. पॉवरग्रीड कंपनीकडून होत असलेल्या मनमानीबाबत शेतकऱ्यांनी यापूर्वी सावनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सोबतच उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सोपविले. मात्र त्यावर कोणताच तोडगा काढण्यात आला नाही. दुसरीकडे पोलीस बलाचा वापर करीत पॉवरग्रीड कंपनीने काम सुरूच ठेवले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय पोलीस अधिकारी, पॉवरग्रीडचे अधिकारी, सावनेरचे ठाणेदार आणि पीडित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात जमीन आणि पिकाचा मोबदला म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला १८ ते २२ लाख रुपये देण्याचे पॉवरग्रीडच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. या बैठकीनंतर पुन्हा दोन दिवसांनी २० जानेवारीला झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी शब्द फिरवित पाच ते सहा लाख रुपयेच देण्याचे मान्य केले. यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनीही काहीही आक्षेप न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. याविरोधात आता पीडित शेतकऱ्यांनी लढा देण्याचे ठरविले आहे, असे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. पत्रपरिषदेला दिनेश धपके, श्रीपत मोहनकर, टेकचंद शांडिल्य, गुलाब रहाटे, अशोक कारेमोरे, रमेश महंत, खोजराज धुंदे, जितू बोडी, किशोर धुंदे, रमेश कोल्हे, नंदकिशोर धुंदे, भूमीराज रहाटे, अमोल रहाटे, दामोदर पटेल, सचिन मिरचे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टॉवर लाईन कामासाठी मनमानी
By admin | Updated: February 2, 2017 02:10 IST