|
नागपूर : अलिकडेच व्याघ्र राखीव क्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आलेल्या नागझिरा-नवेगाव प्रकल्पासाठी स्वतंत्र व्याघ्र संवर्धन फाऊं डेशन स्थापन करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ३८ नुसार देशभरातील व्याघ्र प्रकल्पातील वाघ व जैविक विविधतेच्या संवर्धनासह स्थानिक लोकांच्या सहभागातून ग्राम विकासाची कामे करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने मागदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्वतंत्र व्याघ्र संवर्धन फाऊं डेशनची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय आता नागझिरा-नवेगाव या नवीन व्याघ्र प्रकल्पालाही फाऊं डेशन स्थापण्याची मान्यता मिळाली आहे. या फाऊं डेशनच्या माध्यमातून येथील गावांच्या विकासाला हातभार लागणार आहे. यापूर्वी विदर्भातील ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र संवर्धन फाऊं डेशनच्या माध्यमातून अनेक ग्राम विकासाची कामे करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, देशभरातील अशा विविध फाऊं डेशनला केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून (एनटीसीए) दरवर्षी मोठय़ा प्रमाणात निधी दिला जातो. शिवाय पर्यटनाच्या माध्यमातूनही लाखो रुपयांचा निधी मिळत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी) |