पर्रीकरांच्या वक्तव्याचे संघाकडून समर्थन : मसरत आलमसंदर्भातील चर्चा वायफळनागपूर : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दहशतवाद्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. या विधानावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पर्रीकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानला समजेल अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.संरक्षणमंत्र्यांनी केलेले वक्तव्य काहीच चुकीचे नाही. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांचा वापर करून भारतामध्ये अस्थिरता व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. चर्चेची भाषा जर पाकिस्तानला समजत नसेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे असे संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख अरुण कुमार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले. पाकिस्तानमधील बलुचिस्तान, सिंध येथे मोठा आक्रोश आहे व याचीच परिणिती तेथे अंतर्गत संघर्ष व दहशतवादी हल्ल्यांत होते. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रवृत्तीला त्याच प्रकारे उत्तर देणाऱ्यांचे समर्थन करणे हे भारताच्या फायद्याचेच आहे असे सूचक विधान त्यांनी केले.मनोहर पर्रीकर काय म्हणाले?अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी अतिरेक्यांचा वापर करण्यात गैर काय, असा स्पष्ट सवाल खुद्द देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला होता. देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अतिरेक्यांबाबतच्या वक्तव्यावरून पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. मसरत आलमला महत्त्व नकोआपल्या देशात अनेक गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते व आवश्यक बाबी मागे पडतात. भारताच्या विरोधात घोषणा देणारा फुटीरवादी नेता मसरत आलमवर प्रसारमाध्यमांत मोठी चर्चा होते. परंतु मुळात हा मसरत आलम आहे तरी कोण? याच्याबाबत माहिती तरी कोणाला होती? त्याच्यासारख्या व्यक्तीची चर्चा करण्याची गरजच नाही. याउलट चीनच्या सीमेवर जास्त सोयीसुविधा निर्माण करायला हव्यात. सीमेवरील गावांचा विकास करुन तिथपर्यंत रस्ते न्यायला हवे. मोदी सरकारने त्या दृष्टीने काम सुरू केले आहे व त्यांची दिशा योग्य आहे असे अरुण कुमार म्हणाले.
पाकला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे
By admin | Updated: May 26, 2015 02:26 IST