हायकोर्ट : स्वत:च दाखल करून घेतली जनहित याचिका नागपूर : शहरातील बाजारांच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दखल घेऊन महानगरपालिकेला यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.न्यायालयाने बाजारांच्या दुरवस्थेवर स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अॅड. शशिभूषण वाहाणे न्यायालय मित्र आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, अॅड. वाहाणे यांनी बाजारांची दुरवस्था आजही कायम आहे हे दाखविणारी ‘लोकमत’मधील बातमी न्यायालयासमक्ष सादर केली. न्यायालयाने ही बातमी व समस्यांवरील छायाचित्रे पाहून निर्देश दिलेत. शहरातील कॉटन मार्केट, सक्करदरा बाजार, मंगळवारी बाजार, नेताजी मार्केट, गोकुलपेठ बाजार यासह विविध बाजारांची अत्यंत वाईट अवस्था आहे. बाजारांत सर्वत्र घाण पसरली आहे. बाजारांची नियमित सफाई केली जात नाही.मनपातर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
बाजारांच्या दूरवस्थेवर मनपाने उत्तर द्यावे
By admin | Updated: February 3, 2017 02:24 IST