- जिल्हास्तरावर यादीच नाही : सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंधांनी लोककलावंत हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्ट राेजी राज्यातील ५६ हजार कलावंतांना आणि शेकडो कलावंत संस्थांना आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, अद्याप या आर्थिक मदतीच्या कार्यवाहीसंदर्भातील आदेश जिल्हास्तरापर्यंत पोहोचले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सांस्कृतिक क्षेत्रावरील सलगच्या लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारच्या कलाक्षेत्रांतील कलावंत बेरोजगार झाले आहेत. रंगमंचावरील पहिली घंटा कधी वाजणार, या विवंचनेत राज्यभरात ९ ऑगस्ट रोजी ‘मी रंगकर्मी’ हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाच्या धास्तीनेच मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्ट रोजी कलावंतांना आर्थिक मदतीची घोषणा केली. आंदोलनाचे स्वरूप बघता सांस्कृतिक मंत्र्यांनी सांस्कृतिक क्षेत्राला बरीच शिथिलता बहाल करीत कलावंतांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कलावंतांच्या यादीबाबत कुठलीच स्पष्टता नसल्याने, जाहीर झालेली मदत कधी पोहोचणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हास्तरावर कलावंतांची यादीच नाही आणि आर्थिक मदतीच्या घोषणेच्या अनुषंगाने तशी यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आलेले नसल्याने, मदतीची ही घोषणा केवळ बागुलबुवाच ठरणार काय, असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे.
आदेश आलेच नाहीत
कलावंतांना मदत पोहोचविण्यासंदर्भातील कुठलेही आदेश अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे, कलावंतांना मदत पोहोचविण्याचे कुठलेही काम सुरू झालेले नाही. मंगळवारनंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.
विमला आर. - जिल्हाधिकारी, नागपूर
यादी तयार करण्यासाठी झगडणारे शाहीर भिवगडे यांचे निधन
कलावंत, लोककलावंतांची यादी तयार करा, अशी मागणी सातत्याने लावून धरणारे प्रसिद्ध लोककलावंत व विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष धर्मादास भिवगडे यांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. या पार्श्वभूमीवर तरी जिल्हास्तरावर प्रशासनाने कलावंतांची यादी तयार करून, त्यांना आदरांजली वाहणे अपेक्षित आहे.
कलावंत कसे जगत आहेत, हे कसे सांगणार?
कलावंतांना प्रतिष्ठा त्यांच्या कलेमुळे असते. गेल्या दीड वर्षापासून सर्वच कार्यक्रम बंद असल्याने, या काळात कलावंत पोट भरण्यासाठी सगळेच यत्न करीत आहेत. मात्र, तो कोणते काम करतो, कसले काम करतो... हे कसे सांगणार? हे त्याच्या वृत्तीला पटत नाही. लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमात शहनाईवादन करून माझी उपजीविका चालते. मात्र, ते सर्वच बंद असल्याने काहीतरी करणे आलेच.
- विज्ञानेश्वर खडसे - शहनाईवादक (बी-हायग्रेड कलावंत, आकाशवाणी व विदर्भाचे बिस्मिल्ला खाँ म्हणून उपाधी)
...............