राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील जैन मंदिराच्या खालच्या भागाला असलेली कपूर बावडी ही शहराच्या प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तूंपैकी एक हाेय. देखभाल व दुरुस्तीअभावी या बावडीचे दगड सैल व्हायला व निखळायला सुरुवात झाली आहे. या बावडीची वेळीच दुरुस्ती न केल्यात हा प्राचीन वारसा नामशेष हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, निधी मिळत नसल्याने या बावडीची दुरुस्ती करणे शक्य हाेत नसल्याचे अधिकारी सांगतात. तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून, त्यात या कपूर बावडीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अथवा साधा नामाेल्लेेखही नसल्याने नवल व्यक्त केले जात आहे.
रामटेक शहर व परिसराला प्राचीन व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे रामटेक शहर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. शहर व परिसरातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी शासनाने १५० काेटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ४९.२८ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून शहरातील कपूर बावडीची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना या बावडीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव नसल्याने निसर्गप्रेमींचा हिरमाेड झाला आहे.
ही वास्तू पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. या विभागाने बावडीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी काहीही हालचाली केल्या नाहीत. राज्य शासनाने रामटेकच्या विकासासाठी नुकताच ४९.२८ काेटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात हेरीटेज अंबाडा तलावाचा परिसराच्या विकासासाठी २७.२१ काेटी रुपये मंजूर केले आहेत. गडमंदिर व परिसराच्या विकासासाठी दाेन्ही मिळुन ४९.२८ काेटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात कपूर बावडी ते गडमंदिरपर्यंत पाेच रस्ता (पायवाट)च्या बांधकामासाठी ६० लाख रुपये व कपूर बावडी ते डांबर रस्ता या कामसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पाैराणिक वास्तूचे जतन करणे आवश्यक असताना या कपूर बावडीकडे कुणाचेही लक्ष नाही. शासन, प्रशासन व लाेकप्रतिनिधींना या वस्तूऐवजी राेड व रस्ते महत्त्वाचे वाटत असल्याने दिसून येते. पुरातत्त्व विभागानेही या बावडीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.
...
माेजक्या बावडींपैकी एक
भारतात माेजक्याच बावडी आहेत. त्यात रामटेक शहरातील या कपूर बावडीचा समावेश आहे. गडमंदिराच्या खालच्या भागाला जैन मंदिराजवळ असलेल्या या कपूर बावडीची निर्मिती १,२०० वर्षांपूर्वी यादव घराण्यातील राजांनी केली आहे. हा हेमाडपंथी अद्भुत असा नमुना आहे. चाैकाेनी असलेल्या या बावडीची लांबी व रुंदी ही २३ फूट आहे. बावडीच्या चारही बाजूंनी सभामंडप असून, त्याची उंची २.३० मीटर आहे. बावडीच्या प्रत्येक काठावर ९ स्तंभ तयार केले आहेत. सध्या येथील २४ स्तंभ व २७ अर्ध स्तंभ शिल्लक असून, तेही काेसळण्याच्या अवस्थेत आहेत.
...
गाळ काढणे आवश्यक
या कपूर बावडीजवळ पुरातन सातसारा देवीचे मंदिर आहे. पूर्वी येथे नवरात्री उत्सव साजरा केला जायचा. डाेंगरातील सतत झिरपणारे पाणी हे या बावडीचा जलस्रोत आहे. या बावडीची खाेली १२ मीटर आहे. पूर्वी या बावडीतील पाण्याचा ओलितासाठी वापर केला जायचा. समाेरच एक तलाव असून, तिथे सध्या मासेमारी केली जाते. या बावडीत माेठ्या प्रमाणात गाळ साचल्याने ती बुजल्यागत झाली आहे. काही वर्षांपूर्वी यातील गाळ काढला हाेता. ताे पुन्हा काढणे आवश्क आहे. या बावडीचे दगड सैल झाल्याने ते काेसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने या बावडीची दुरुस्ती करून जतन करणे अत्यावश्यक आहे.