नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी अमोल वसंत सोनोले (३०) याला ३ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. पी. एफ. सय्यद यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
आरोपी देवग्राम, ता. नरखेड येथील रहिवासी आहे. ही घटना २१ नाेव्हेंबर २०१७ रोजी घडली. त्यावेळी पीडित मुलगी १३ वर्षे वयाची होती. आरोपी हा पीडित मुलीच्या घराजवळ राहतो. पीडित मुलगी आरोपीच्या मुलाला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. दरम्यान, आरोपीने तिला पाणी मागितले. मुलगी पाणी आणण्यासाठी घरात गेली असता आरोपीने तिला मागून पकडले. मुलगी ओरडल्यानंतर आरोपीने तिला सोडून दिले. त्यानंतर मुलीने घरी परत जाऊन आरोपीच्या कुकृत्याची माहिती दिली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले.