फेसबुक दर्शकांना दाखवताहेत कोट्यधीश होण्याचे स्वप्न राहुल अवसरे नागपूर कथित अमेरिकन आर्मीतील महिला कोट्यधीश होण्याचे स्वप्न दाखवीत आहेत. फेसबुक मॅसेंजरवर त्यांनी हल्लाच केला आहे. संपूर्ण जगात लोकप्रिय ठरलेल्या फेसबुकच्या माध्यमातून लुबाडण्याचा हा ‘फंडा’ अलीकडे जोरात सुरू आहे. फेसबुक दर्शकाला काहीसे भावनेत गुरफटत ठेवून वडिलोपार्जित गडगंज संपत्तीच्या वाट्यात सहभागी करण्याचा सायबर चिटर्स महिलांचा हा प्रस्ताव फसवेगिरी असल्याचे बोलले जात आहे. या पूर्वी लॉटरीच्या फंड्याने अनेकजण लुबाडल्या गेले आहेत. फेसबुकवर नकळत विदेशी आकर्षणामुळे झालेली ही मैत्री आता विश्वासघात करीत आहे. या महिलांनी पाठविलेल्या संदेशाचे काही नमुने असे, रोझेल पॉल ५६ लाख डॉलर्सची मालकीण रोझेल स्टिव्हन पॉल नावाची ही महिला युनायटेड स्टेट मिलिटरी शाखेच्या आर्मी ब्रँचमध्ये सार्जंट असल्याचा दावा करीत आहे. ती ३२ वर्षीय असून पुष्टीसाठी तिने मिलिटरी गणवेषातील स्वत:चे छायाचित्र पाठविले आहे. तिच्या म्हणण्यानुसार ती बफॅलो न्यूयार्कची मूळ रहिवासी आहे. ती सध्या इराकमध्ये असून दहशतवाद्यांशी लढत आहे. ती म्हणते, मी दुर्दैवी आहे. जीवनाने माझ्यासोबत कधीही न्याय केला नाही. २१ वर्षांची असताना माझे आई-वडील मरण पावले. मला मदत करणारे कोणीही नव्हते. देवच तेवढा होता. त्यामुळेच मी यूएस मिलिटरीत दाखल झाले. माझे लग्न झाले, एक मुलगा झाला, परंतु तो मरण पावला. माझ्या पतीने माझी फसवणूक केली आणि त्याला मी कायमचे सोडले. मी सध्या एकटी आहे, मी माझे अख्खे जीवन सुखी समाधानाने जगू शकेल, अशा योग्य साथीदाराच्या शोधात आहे. ती व्यक्ती आपण आहात, आपल्यासोबत झालेल्या संवादातून मला ही जाणीव झाली आहे. आजवर मी संपूर्ण जगाशीच संपर्क साधला तुमच्यासारखी व्यक्ती गवसली नाही. इराकमध्ये असताना मी ५६ लाख अमेरिकन डॉलर्स जमवून ठेवले आहे. रेड क्रॉस सोसायटीच्या मानवतावादी डॉक्टरांकडे एक पेटी सोपवली आहे. या पेटीत काय आहे, हे त्यांनाही माहीत नाही. यात माझा वैयक्तिक ठेवा असल्याचे त्यांना सांगितले आहे. हा वाटा आपण स्वीकारून सुरक्षित ठेवावा, यासाठी मिलिटरी पास घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या देशात येण्याची माझी तयारी आहे. हे पैसे तुम्ही तुमच्या बँक खात्यात ठेवावे, यातील ४० टक्के रक्कम तुम्हाला देईल. माझे इराकमधील मिशन संपल्यानंतर मी तुम्हाला आमोरासमोर भेटण्यास येईल, पुढचे सोपस्कार मी तुम्हाला ई-मेलद्वारे कळवीत राहील. हिला लेव्हीकडे ३५ लाख डॉलर्स हिला लेव्ही ही स्वत:ला कॅप्टन संबोधते. ती ३० वर्षांची आहे.ती युनायटेड स्टेटच्या साऊथ इस्टर्न स्टेटमधील प्युर्टो रिकॅन (केन्चुकी) ची रहिवासी आहे. ती अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या वायूदलातील शांतीसेनेत सोल्जर म्हणून कार्यरत आहे. ती दहशतवाद्यांशी लढा देत आहे. अफगाणिस्तानात आपण ३५ लाख अमेरिकन डॉलर्स जमवल्याचे तिचे म्हणणे आहे. एका रेड क्रॉस एजंटकडे ही रक्कम जमा केली आहे. आपण या रकमेचे लाभार्थी व्हावे आणि जोपर्यंत मी आपणास भेटत नाही, तोपर्यंत ही रक्कम आपल्याजवळ ठेवावी. आपण मला रकमेतून चांगला फायदा मिळवून दिल्यास तुम्हाला मी ३५ टक्के रक्कम देईल. तुमची तयारी असल्यास मी तुम्हाला ही रक्कम कुठे जमा करायची याबाबतची माहिती देईल. तातडीने आपल्या उत्तराची अपेक्षा आहे. लेव्हीने विश्वास बसावा म्हणून स्वत:चे मिलिटरी गणवेशातील छायाचित्र पाठविले आहे.
कथित अमेरिकन आर्मी महिलांचा लुबाडणुकीचा फंडा
By admin | Updated: March 13, 2017 01:58 IST